कोल्हापूर – लाडकी बहीण योजनेवरून महिलांबाबत आक्षेपार्ह विधान भाजप खासदार धनंजय महाडिक यांना चांगलेच भोवले आहे. महाडीक यांनी कोल्हापुरात एका जाहीर प्रचारसभेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्या प्रकरणी महाडिक यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कोल्हापूर दक्षिण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महाडिक यांना तत्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महाडिक यांनी खुलासा दिला. पण महाडिक यांचा खुलासा अमान्य करीत त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.
धनंजय महाडिक यांनी एका सभेत लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत म्हटलं होतं की, सरकारने आणलेल्या लाडक्या बहीण योजनेला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र असं असतानाही काँग्रेस याला विरोध करत आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा घेऊन ज्या महिला काँग्रेस रॅलीत सहभागी होतील त्यांचे फोटो काढा. मी त्यांची व्यवस्था करतो, असं महाडिक यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर महाडिक यांनी जाहीर माफी मागितली होती.