हैदराबाद : देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक खळबळजनक घटना आता समोर आली आहे. हैदराबाद मधील एका पोलिस ठाण्यात गेल्या २३ दिवसांत १४ हून अधिक व्यक्ती बेपत्ता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. लोकांच्या बायका अचानक गायब होत असल्याचे म्हटले आहे. पोलिस ठाण्यात सरासरी दर दीड दिवसाला बेपत्ता व्यक्तीची नोंद होणारी प्रत्येक घटना धक्कादायक आहे.
१८ एप्रिल २०२४ रोजीही अशीच घटना घडली आहे. तारकानागा प्रामाणिक यांनी सायबराबाद पोलिस ठाण्यात सायंकाळी ६.१५ वाजता पोहोचून पोलिस अधिका-यांकडे पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार केली. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची २२ वर्षीय पत्नी प्रिया फोनवर कोणाशी तरी बोलत होती. यावरून त्यांचे पत्नीशी भांडण झाले. दुस-या दिवशी ऑफिसमधून घरी पोहोचले तेव्हा त्यांची पत्नी घरातून बेपत्ता होती. त्यांनी पत्नीचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती कुठेच सापडली नाही. १९ एप्रिल २०२४ रोजीही ही असाच प्रकार घडला आहे. मुन्नी मौलाबी नावाच्या महिलेने सायबराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आणि सांगितले की, तिचा पती शेख रफी दुबईहून आपल्या मुलीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आला होता. लग्नानंतर, १५ एप्रिल २०२४ रोजी ते हैदराबाद विमानतळावर जाण्यासाठी घरातून निघाले, तेथून ते सौदीला रवाना होणार होते. १६ एप्रिल रोजी दुपारी २.३० च्या सुमारास त्यांनी एका अज्ञात व्यक्तीच्या नंबरवरून मुलीला फोन केला पण त्यानंतर त्यांच्याबाबत काहीच माहिती नाही.
या सर्व तक्रारींवर स्थानिक पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवून बेपत्ता महिला आणि इतर लोकांचा शोध सुरू केला आहे. सायबराबाद पोलिस स्टेशनमध्ये १७ एप्रिल २०२४ ते १० मे या कालावधीत बेपत्ता व्यक्तींच्या १४ हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. एका विमानतळ सुरक्षा अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, कट्टा अंजनेयुलु राव नावाच्या व्यक्तीने सायबराबाद पोलिस स्टेशनमध्ये आपली २७ वर्षीय मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती.