दिशा सालियन मृत्यू : वडिलांची हायकोर्टात रिट याचिका, २ एप्रिलला सुनावणी

0

– आदित्य ठाकरेंविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. सदर याचिका न्यायालयाने स्विकारली असून त्यावर बुधवार, २ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. सदर याचिकेद्वारे प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी, तसेच या प्रकरणाची एनआयए चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात विविध प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहेत. तपास अधिकारी समीर वानखेडे यांचे वकील फैजान मर्चंट यांनी सांगितले की, त्यांचे अशील उच्च न्यायालयात एक सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहेत. ज्यामध्ये त्यांच्या अशिलांसंबंधीच्या सर्व मुद्द्यांची उत्तरे दिली जातील.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियनच्या अंत्यविधीचे पाच वर्षांनंतर फोटो समोर आले आहेत. विशेष म्हणजे, चेहऱ्यावर एकही जखम दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दिशाने १४ व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले होते. मालाड येथील राहत्या घरातून तिने उडी मारून आयुष्य संपवले होते. पण, दिशाचा मृत्यू उडी मारून नव्हे तर तिची सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियन यांनी आता केला आहे. दिशाची सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप करत एनआयएमार्फत चौकशीचे आदेश द्या, असेही त्यांनी म्हटले आहे.

याचिकेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पांचोली, दिनो मोरीयो यांच्यासह मुंबई पोलिसांवर या याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड करण्यात आल्याचे दिशाच्या वडिलांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्यात यावा, अशी मागणी सतीश सालियन यांनी केली असून माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप देखील दिशाच्या वडिलांनी केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech