मुंबई : बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व अनेक कारणांमुळे गाजलं. यामध्ये निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यातील वाद यामुळे हा शो जास्त चर्चेत होता.दोघींच्या भांडणांमुळे प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन व्हायचं. आता सीझन संपून बरेच दिवस झालेत तरी निक्की आणि वर्षाताई यांच्यातला वाद संपलेला नाही. नुकतंच एका कार्यक्रमात वर्षा ताई निक्कीबद्दल बोलल्या. त्यावर निक्कीनेही त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
अभिनेत्री वर्षा उसगांवकर नुकतंच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. तिथे त्या बिग बॉसमधली आठवण सांगत निक्कीचं नाव घेत म्हणाल्या, “निक्की, मी तिला सीझन ५ ची खलनायिका म्हणायचे. तिला एक दिवस राग आला. माझी बहीण घरात मला भेटायला आली तेव्हा मी निक्कीची ओळख करुन देताना म्हटलं की ‘व्हॅम्प नंबर १’. यानंतर निक्की रात्री मला म्हणाली की ताई तुम्ही मला खलनायिका म्हटलं ते आवडलं नाही. मी म्हणाले, ‘सॉरी’. पण तू तशीच वागतेस गं. माझ्याशी तशीच तर वागलीस. आता तुला खलनायिका म्हणायचं नाही तर काय नायिका म्हणायचं. दिसते नायिकेसारखी पण वागत होती खलनायिकेसारखी.”
यावर आता निक्कीने वर्षा उसगांवकरांचा हा व्हिडिओ शेअर करत उत्तर देत लिहिले की, “त्यांनी तर माझी माफी मागितली होती आणि त्यांनी केलेल्या स्टेटमेंटचं त्यांनाही वाईट वाटलं होतं. त्यांना तेव्हाच त्यांची चूक लक्षात आली होती. आता असं दुतोंडी का बोलताय. लोगो की बाते कम और अपनी बातो से अपना घर चलाओ मॅडम जी.” असं निक्कीने वर्षाताईला पुन्हा एकदा सडेतोड उत्तर दिलं आहे. आता यावर वर्षा ताई काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. बिग बॉस मराठी पर्व संपूनही वर्षा आणि निक्कीचा वाद काही मिटताना दिसत नाही. बिग बॉसनंतर त्या पुन्हा कधी एकत्रही दिसल्या नाहीत. निक्की तांबोळीचं शोमध्ये अरबाज आणि अभिजीतशीच पटलं होतं. आता घराबाहेर आल्यानंतरही ती फक्त या दोघांसोबतच दिसली आहे.