तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती
चेन्नई : तब्बल बारा तासांच्या वादळी चर्चेनंतर लोकसभेत बुधवारी मध्यरात्रीनंतर वक्फ सुधारणा विधेयकाला बहुमताने मंजुरी देण्यात आली. आज, गुरुवारी हे विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. परंतु, तामिळनाडूत सत्ताधारी असलेल्या द्रविड मुणेद्र कडघम (डीएमके) पक्षाने या विधेयकाला कोर्टात आव्हान देणार असल्याचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी आज, गुरुवारी विधानसभेत सांगितले.
लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकाच्या समर्थनार्थ २८८ सदस्यांनी मतदान केले, तर २३२ सदस्यांनी विरोध केला. तसेच, २३ जणांनी मतदानात भाग घेतला नाही. विधेयकावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपली ताकद दाखवून दिली. आज विधेयक राज्यसभेमध्ये मांडण्यात आले आहे. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम के स्टॅलिन यांनी या विधेयकाला तीव्र विरोध केला आहे. आपला पक्ष या विधेयकाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी विधानसभेत बोलताना सांगितले.
वक्फ विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याच्या निषेधार्थ आज स्टॅलिन विधानसभेत हाताला काळी पट्टी बांधून आले होते. विधानसभेत स्टॅलिन म्हणाले की, देशातील बहुसंख्य राजकीय पक्षांनी या विधेयकाला विरोध केला होता. मात्र केंद्र सरकारने हा विरोध जुमानला नाही. काही मित्रपक्षांच्या इशाऱ्यावर पहाटे 2 वाजता ही दुरुस्ती स्वीकारणे हे संविधानाच्या रचनेवर हल्ला आहे. ही धार्मिक सलोखा बिघडवणारी कृती आहे. हे अधोरेखित करण्यासाठी, आम्ही आजच्या विधानसभेच्या कामकाजात काळी पट्टी बांधून सहभागी होत असल्याचे स्टॅलिन यांनी सांगितले.