डोंबिवली जवळील हेदूटणे गावातील गुरचरण जागा म्हाडास देण्यासाठी धोरण अंमलबजावणी सुरू आहे कारण याच जागेवर मुंबईतील बंद पडलेल्या कापड गिरणी कामगारांना याच जमिनीवर घरे बांधून देण्याचा निर्णय तत्कालिन सरकारने घेतला आहे. त्यानुसार म्हाडामार्फत गिरणी कामगारांना घराचे वाटप करण्यात येणार असल्याने त्याचाच भाग म्हणून डोंबिवली जवळील हेदूटणे गावातील गुरचरण जागा हस्तांतरण करण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे या विषयावर भूमिपुत्र आंदोलनाच्या तयारीत आहेत.
मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठी हेदूटणे गावातील गुरचरण जागा म्हाडास देण्यासाठी धोरण सुरू आहे. सदर जागेच्या सर्वेसाठी तहसीलदारांसह म्हाडाची सर्वे टीम संपूर्ण पोलीस बंदोबस्तासह हेदूटणे गावात आली होती. दरम्यान तेथे ४०० ते ५०० ग्रामस्थांनी केलेल्या प्रचंड विरोधाने हा सर्वे थांबवण्यात आला. अखेर तहसीलदार आणि आमदार राजू पाटील यांच्या मध्यस्थीने हा सर्वे थांबविण्यात आला.
येथील गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गावठाण विस्तार झाला नाही त्यामुळे गावकऱ्यांनाच घरे बांधायला जागा नाही. त्यामुळे या जागेवर गिरणी कामगारांना घरे बांधून देण्याचे सरकारी धोरण ग्रामस्थांना मान्य नाही. असे न करता आम्हा ग्रामस्थांनाच या जमिनीवर घरे बांधून द्यावी. गावाची गुरुचरण जमीन गावासाठी राखून ठेवली आहे त्यावर क्रिकेट ग्राउंड, समाज मंदिर, शाळा, शासकीय आरोग्य केंद्र आणि गुरांना चरण्यासाठी आम्ही आजही शाबूत ठेवली आहे. त्यामुळे ही जमीन म्हाडास देण्यासाठी ग्रामस्थांचा तीव्र विरोध असेल अशी भूमिका माजी सरपंच तकदीर काळण यांच्यासह हरिश्चंद्र भंडारी, पोलीस पाटील, रुपेश पाटील यांनी मांडली आहे.