भूकंपग्रस्त गावांतील वनीकरणाची डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून प्रशंसा !

0

लातूर : लातूर जिल्ह्यातील २१ भूकंपग्रस्त गावांच्या मूळ गावठाणात वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून विविध योजनांअंतर्गत ६८ हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवड करण्यात आली आहे. या उपक्रमाचे महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशंसा केली. तसेच, या वृक्षांचे संगोपन करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना एकत्रित मार्गदर्शक सूचना देऊन त्यांची मदत घ्यावी, असे त्यांनी सांगितले. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत लातूर शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीत भूकंपग्रस्त गावांतील वनीकरण, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, अंमली पदार्थविरोधी कार्यक्रम, ऊसतोड कामगारांचे प्रश्न आदी विषयांवर चर्चा झाली.

भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या गावठाणामध्ये वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून वृक्षलागवड करून या गावांचे रूप पालटण्याचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत वन विभागाने ११ गावांमध्ये ४६ हेक्टर क्षेत्रावर, तर सामाजिक वनीकरण विभागाने १० गावांमध्ये २२ हेक्टर क्षेत्रावर वनीकरण केले आहे. यात रोपवन, फुलपाखरू उद्यान, कॅक्टस गार्डन आणि घनवन यांचा समावेश आहे. या उपक्रमाचे कौतुक करताना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी ग्रामपंचायतींना वृक्षांची निगा राखण्यासाठी मार्गदर्शन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, भूकंपग्रस्त गावांतील गावठाणच्या उर्वरित क्षेत्रावर वृक्षलागवडीचे नियोजन करून आगामी पावसाळ्यात हे काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी दक्षता समिती : वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रत्येक वसतिगृहात दक्षता समिती स्थापन करावी, असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. या समितीत स्थानिक प्रशासनातील अधिकारी आणि संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी यांचा समावेश असावा. या समितीने पालकांसमवेत नियमित बैठका घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी चार वसतिगृहे कार्यान्वित झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि या विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा : जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळामुळे शेतपिकांचे, विशेषतः फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेताना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यात एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही याची काळजी घ्यावी, असे त्यांनी जिल्हा प्रशासनाला सांगितले.नागरिकांमध्ये नशामुक्तीबाबत जनजागृती करण्यावर भर द्यावा, असे सांगून जिल्हा परिषदेच्या शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस आणि वसतिगृहांमध्ये पथनाट्याद्वारे नशामुक्तीची माहिती देण्याच्या सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी संबंधित विभागांना दिल्या.यावेळी लातूर शहरातील स्वच्छता, पिण्याचे पाणी, पीक विमा योजना आदी विषयांचाही आढावा घेण्यात आला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech