मुंबई – महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या ११ संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील एसटी बस सेवा गंभीरपणे बाधित झाली आहे. २५१ आगारांपैकी ३५ आगार पूर्णतः बंद असून, उर्वरित आगारांमध्ये वाहतूक आंशिकपणे सुरू आहे. संपामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मुंबई विभागातील एसटी सेवा सुरळीत असली तरी ठाणे विभागातील कल्याण आणि विठ्ठलवाडी आगार पूर्णतः बंद आहेत. विदर्भातील आगारांवर बंदचा फारसा परिणाम दिसला नाही परंतुु मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद आहेत. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागात वाहतूक सुरू आहे. पुणे, सांगली, आणि सातारा जिल्ह्यात अनेक आगार बंद आहेत. खानदेशातील नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांतील काही आगार देखील बंद आहेत, त्यामुळे गणेशोत्सवासाठी नियोजित जादा वाहतुक फेऱ्यांवर परिणाम झाला आहे. स्वारगेट बस स्थानकातून सुटणाऱ्या सर्व गाड्या बंद आहेत. फक्त रात्री मुक्कामी असलेल्या गाड्या स्थानकाबाहेर पडणार आहेत.
या संपात चालक, वाहक तसेच ५०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. मिरज आणि सातारा स्थानकांतून फक्त १० टक्के बस धावत आहेत, तर कोल्हापूरातून पुणे-मुंबईकडे बस सेवा सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, कॅशलेस वैद्यकीय सेवा, आणि कुटुंबीयांसाठी मोफत पास सवलत या समाविष्ट आहेत. सदर आंदोलनावर तातडीने तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.अन्यथा आंदोलन आणखी चिघळल्यास ऐन सणासुदीच्या काळात सामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.