रत्नागिरी – हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्यावर टीका करणारे ज्ञानेश महाराव आणि त्यांना मूकसंमती देणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र गट) अध्यक्ष शरद पवार यांचा भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजितदादा गट) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निषेध केला. सारा अट्टहास हिंदूंच्या रक्षणासाठी नाठाळांच्या माथी हाणू काठी, या पवारांचे करायचे काय खाली डोके वर पाय, महारावचा धिक्कार असो अशा घोषणा देत निषेध आंदोलन केले. यापुढे हिंदू देवता, धर्माबद्दल टीका सहन करणार नाही, तर उग्र आंदोलन करू, असा इशारा याप्रसंगी देण्यात आला.
ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थांवर अश्लाघ्य टीका केली. वाशी येथे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात त्यांनी ही टीका केली. त्यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती होते. त्यांच्यासमोर ही टीका करून पवार व छत्रपतींनी ऐकून कशी घेतली, असा सवाल यावेळी करण्यात आला. पवार व छत्रपती यांनी कोणतीही प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केली नाही. म्हणजे महारावांच्या वक्तव्याला त्यांची मूकसंमती होती का, असा आरोप या वेळी महायुतीकडून करण्यात आला.
हिंदू धर्माकडे बोट दाखवत अशांना जोड्याने मारले पाहिजे, असे सांगत पवारांचा कडक शब्दांत निषेध नोंदवण्यात आला. हिंदू धर्मातील लोक कधी जागृत होणार, आपली श्रद्धास्थाने. देवदेवता यांच्यावर किती दिवस ऐकून घ्यायचे, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. राजकारण करताना या विषयात हस्तक्षेप करू नये, अन्यथा अधिक उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी महायुतीने दिला. उद्धव ठाकरे यावरही बोला, हिंदू धर्माचा अपमान, शरद पवार यावरही बोला, वारकरी संप्रदायाचा अपमान तुम्हाला मान्य आहे का, असे फलक आंदोलनकर्त्यांच्या हातात झळकत होते. याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष राजन फाळके, तालुकाध्यक्ष दादा दळी, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, प्राजक्ता रुमडे, मंदार भोळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंटी वणजू, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहराध्यक्ष बिपिन बंदरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.