मुंबई : महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना अखेर काँग्रेस आणि वाटा शिवसेनेच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने आज तडकाफडकी हटवले आहे. निवडणूक आयोगाने उद्या दुपारी एक वाजेपर्यंत पोलीस महासंचालक पदासाठी तीन सेवा जेष्ठ भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या नावांची यादी निवडणूक आयोगाकडे पाठवण्याचे आदेशही दिले आहेत.
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेवट्टीवार यांनी भाजपशी सलगी असल्याचे आरोप केले होते. 2019 मध्ये राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यानंतर सत्ताधारी नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आघाडीच्या नेत्यांनी त्यावेळी केला होता. या प्रकरणात महाआघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेवर असताना रश्मी शुक्ला यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झाला होता. अर्थात पुन्हा महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यानंतर महायुती सरकारने रश्मी शुक्ला यांच्यावरती दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द केले होते…
रश्मी शुक्ला यांना महायुती सरकारने त्या सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील कायद्यामध्ये आणि नियमांमध्ये बदल करून राज्याच्या पोलिस महासंचालक पदी दोन वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. यावरून देखील मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला होता. राज्यात निवडणुका असताना सेवानिवृत्त झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यालाच पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालक पदी दोन वर्ष मुदतवाढ देण्याच्या निर्णयाला विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने आज घेतलेल्या या निर्णयाबद्दल राज्यातील काँग्रेस नेत्यांनी तसेच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.
याबाबत मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून केलेल्या आरोपांबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत नाना पटोले यांनी एकतर त्यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत अन्यथा त्यांनी केलेल्या बेछूट आरोपांबाबत त्यांची निवडणूक आयोगाकडे भाजप तक्रार करणार असल्याचे मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले.