एलॉन मस्क यांच्या टेस्लाच्या गाड्यांना आग, कार मालकांची खासगी माहितीही लीक

0

वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या गाड्यांना आग लावण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपासून एलॉन मस्क हे चांगलेच चर्चेत आले आहेत. अशातच आता सायबर गुन्हेगारांकडून एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या गाड्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. अमेरिकेत अनेक टेस्ला गाड्यांना आग लावण्यात आली आहे. तर टेस्ला गाडीच्या मालकांची वैयक्तिक माहितीही लीक होत आहे. यामुळे एलॉन मस्क यांची चिंता वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत एलॉन मस्क यांच्या टेस्ला कारला लक्ष्य करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मंगळवारी(दि. १७) लास वेगासमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये टेस्लाच्या अनेक कार जळताना दिसत आहेत. लॉस एंजेलिस पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळाजवळ काळ्या रंगाचा पोशाख घातलेला एक व्यक्ती टेस्लाच्या अनेक कार पेटवताना दिसला. मात्र, या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एफबीआयने याला संभाव्य दहशतवादी हल्ला म्हटलं आहे. त्यानंतर कॅन्सस सिटीमध्ये दोन टेस्ला सायबर ट्रकला आग लावण्यात आली. त्यानंतर दक्षिण कॅरोलिनामध्ये टेस्ला चार्जिंग स्टेशनला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्लेखोरोने मोलोटोव्ह कॉकटेल आणि बंदुकीचा वापर केला. या हल्ल्यात टेस्लाच्या किमान पाच वाहनांचे नुकसान झाले.

सायबर गु्न्हेगारांनी ‘डोजक्वेस्ट’ नावाची वेबसाइट तयार करून हजारो टेस्ला मालकांची वैयक्तिक माहिती लीक केली आहे. या वेबसाइटवर कार मालकांची नावे, पत्ते आणि फोन नंबर टाकण्यात आले आहेत. या डेटा लीकमुळे टेस्ला मालकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कार मालकांनी टेस्लाची गाडी विकून टाकलीय हे सिद्ध केल्यावरच हा डेटा हटवला जाईल असा इशारा हॅकर्सनी दिला आहे. टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनीही सोशल मीडियावर वाहनांना आग लावण्याचे हे व्हिडिओ शेअर केले असून त्यांना दहशतवादी घटना म्हटले आहे. या प्रकारची हिंसा वेडेपणा आणि पूर्णपणे चुकीची आहे. टेस्ला फक्त इलेक्ट्रिक कार बनवते आणि असे हल्ले आपल्यावर व्हायला नकोत, असं मस्क यांनी म्हटलं.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech