‘पुढच्या वर्षी लवकर या…’ राज्यभरात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप

0

मुंबई – ‘पुढच्या वर्षी लवकर या’, ‘निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी…’, असे म्हणत राज्यभरातील करोडो गणेशभक्तांनी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. मुंबई, पुण्यासह राज्यातीलच नव्हे, तर जगभरातील विविध ठिकाणी गणेश चतुर्थीला लाडके बाप्पा घरोघरी किंवा भव्य दिव्य गणेशमूर्ती मोठ्या उत्साहात सार्वजनिक मंडळात विराजमान झाल्या होत्या. मात्र आज १० दिवसांचा पाहुणचार घेऊन भाविकांकडून निरोप देण्यात आला.

यामध्ये मुंबईत लालबागचा राजा, केशवजी नाईक चाळमधील गणपती (गिरगाव), चिंतामणी (चिंचपोकळी), नरे पार्कचा गणपती (परळ), गणेश गल्लीचा राजा, तेजुकाया गणपती (लालबाग), जीएसबी गणपती (किंग्ज सर्कल) आदी गणपती विशेष प्रसिद्ध आहेत. तसेच पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आदी पारंपारिक गणपती आहेत. गणेशोत्सवात महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून या गणपतींच्या दर्शनासाठी भाविक मुंबई, पुण्यात येत असतात. याशिवाय अन्य प्रमुख शहरांतही पालखी, ढोल-ताशा, लेझीम, वाजत गाजत पारंपारिक वेशभूषेत निरोप देण्यात आला.

यावेळी विविध ठिकाणी विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर तर अरबी समुद्र आणि भाविकांचा जनसागर एकमेकांमध्ये समाविष्ट झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते.विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीचे विसर्जन, तर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरीच्या बाप्पालाही निरोप, बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांची गर्दी पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती साकारली होती. पुण्यात गणेशोत्सवाचा आगळा-वेगळा जल्लोष दिसून आला. यासोबतच राज्यातील नागपूर, अमरावती, वर्धा, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, छत्रपती संभाजीनगर, बिड येथे गणेश विसर्जनाची धूम दिसून आली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech