नवी दिल्ली : भारतीय लष्कराने मेसर्स एल अँड टी लिमिटेडसोबत बाय इंडियन अर्थात भारतीय उत्पादनाची खरेदी (स्वदेशी रचना, विकसित आणि निर्मित) या श्रेणीअंतर्गत २२३ स्वयंचलित रासायनिक घटक शोध आणि इशारा (ACADA – Automatic Chemical Agent Detection and Alarm) प्रणालीच्या खरेदीसाठी ८०.४३ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. या कराराअंतर्गत संबंधित उपकरणांचे 80% पेक्षा जास्त सुटे भाग आणि उप – प्रणाली स्थानिक पातळीवरून उपलब्ध केले जाणार आहेत, यामुळे भारत सरकारच्या आत्मनिर्भरतेच्या मोहिमेला मोठी चालना मिळणार आहे. स्वयंचलित रासायनिक घटक शोध आणि इशारा (ACADA) प्रणाली ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या ग्वाल्हेर इथल्या आस्थापन शाखेने विकसित केली आहे. ही कामगिरी भारताच्या रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी आणि अणु (CBRN – Chemical, Biological, Radiological and Nuclear) हल्ल्यांपासून सुरक्षेसाठी स्वदेशी उपकरणांच्या वापराच्या प्रयत्नांमधील मैलाचा दगड ठरली आहे.
वातावरणातील हवेचे नमुने घेऊन रासायनिक युद्ध घटक (CWA – Chemical Warfare Agents) आणि वापराचा हेतू निश्चित केलेली (programmed) विषारी औद्योगिक रसायने शोधण्यासाठी स्वयंचलित रासायनिक घटक शोध आणि इशारा प्रणालीचा वापर केला जातो. ही प्रणाली आयन गतीशीलता वर्णमापन (Ion Mobility Spectrometry – IMS) तत्त्वावर काम करते. यात सातत्यापूर्ण पद्धतीने हानिकारक / विषारी घटकांचा शोध घेण्यासाठी तसेच समांतरपणे अशा घटकांच्या देखरेखीसाठी दोन अत्यंत संवेदनशील आयएमएस सेल्सचा अंतर्भाव केलेला असतो. स्वयंचलित रासायनिक घटक शोध आणि इशारा (ACADA) प्रणालीचा भारताच्या लष्करात प्रत्यक्ष वापरासाठी अंतर्भाव केल्यामुळे, प्रत्यक्ष मोहीमांदरम्याने रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी आणि अणु (CBRN) या क्षेत्रातील, विशेषतः औद्योगिक अपघातांशी संबंधित आपत्त्कालीन परिस्थितीच्या निवारण संदर्भात भारताची संरक्षण आणि प्रतिकार क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढू शकणार आहे.