पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या बीज सोहळ्यानिमित्त हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी देहू संस्थान चे विश्वस्त उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तुकाराम बीज निमित्त आज लाखो वारकरी देहूत दाखल झाले आहेत.
तुकोबांची पगडी, शाल, श्रीफळ, पुष्पहार, चिपळ्या, संत तुकाराम महाराज मूर्ती, संत गाथा आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. शिंदे यांनी पंढरपूर वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवा- सुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची आणि ‘निर्मल वारी, हरित वारी’ संकल्पनेत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. त्यांनी पालखी सोहळ्यातील दिंड्यांना आर्थिक सहाय्य, स्वच्छता मोहिमा आणि इतर सेवा- सुविधांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. हा सन्मान २५ वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना देण्यात आला होता. आज जगद्गुरू तुकोबांचा ३७५ वा सदेह वैकुंठ गमन सोहळा आहे. दुपारी ठीक बारा वाजता कीर्तन झाल्यानंतर नांदूरकीच्या झाडावर वारकरी पुष्प अर्पण करताच हा सोहळा पार पडेल.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. शूर वीरांची भूमी आहे. महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. हा एकनाथ शिंदें चा शब्द आहे. धर्माचे रक्षण करणं जस आपलं कर्तव्य आहे. तसेच नद्या प्रदूषण मुक्त करण आपलं काम आहे. असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल आहे. ते देहू मध्ये बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देहू संस्थान कडून श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर ते वारकऱ्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी देहू संस्थान आणि वारकऱ्यांचे विशेष आभार मानले.