मुंबई – राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्यापुढे नवरात्रौत्सव, दिवाळी तसेच आगामी कालावधीत होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका लक्षात घेता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस खात्यांतर्गत विभागीय पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या परीक्षा – सन २०२३ ची पूर्वपरीक्षा झाली असून मुख्य परीक्षा नजीकच्या काळात प्रस्तावित आहेत, मात्र राज्यातील एकंदरित परिस्थिती लक्षात घेता सदर मुख्य परीक्षा आगामी विधानसभा निवडणूकीनंतर घेण्यात यावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे
दिनांक ५ सप्टेंबर, २०२४ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांना पाठविलेल्या पत्रात महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी वरील वस्तुस्थितीकडे लक्ष वेधले असून पोलीस कर्मचारी वर्ग, एसआरपीएफ जवान यांना उपरोक्त प्रसंगी बंदोबस्तासाठी तैनात केले गेले असल्यामुळे परिक्षेस बसलेल्या उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्यास पुरेसा वेळ मिळणार नाही. ही सबब, परीक्षा डिसेंबर, २०२४ मध्ये घेण्यात यावी अशी शिफारस या पत्राद्वारे करण्यात आली आहे.