सिंधुदुर्ग – मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावंतवाडी बस स्थानक आणि तिलारीग्रस्तांचे वन टाइम सेटलमेंट हे प्रश्न वगळता मतदार संघातील सगळे प्रश्न मी सोडवले असा दावा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. ते आज सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान नितेश राणे यांना मतदारसंघात जाऊन त्रास देणाऱ्यांना पदावरून बाजूला करावे तसेच संजू परबांनी नाहक टीका करण्यापेक्षा लँडमाफिया कोण यांची नावे फोटोसह जाहीर करावीत असे त्यांनी सांगितले. केसरकर यांनी आज आंबोली ग्रामस्थांची बैठक घेतली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते
यावेळी केसरकर म्हणाले, चौकुळ प्रमाणे आंबोली आणि गेळेवासियांचा जमिनीचा प्रश्न आचारसंहितेपूर्वी सुटणार आहे त्यांच्या मागणीनुसारच त्यांना जमिनी वाटप करण्यात येणार आहे. वन जमिनीचा प्रश्न मार्गी लागण्यास वेळ लागणार आहे. परंतु सकारात्मक धोरण घेऊन जमिनी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे चौकुळप्रमाणे या दोन्ही गावांनाही न्याय मिळेल. सावंतवाडी मतदारसंघातील सर्व प्रश्न आपल्याला सोडवण्यात यश आले आहे. मात्र मल्टी स्पेशलिटी रुग्णालय सावंतवाडी बस स्थानक प्रश्न आणि तिलारीग्रस्तांचे वन टाइम सेटलमेंट हे तीन प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत असे ते म्हणाले. यातील मल्टीस्पेशालिटीचा प्रश्न लवकरच सोडवण्यात येणार आहे. जमिनीचा तिढा सुटला आहे. राजघराण्याने मान्यता दिली आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटल्यात जमा आहे.
सावंतवाडी बस स्थानकाचा प्रश्न अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात वाद झाल्यामुळे ते काम रेंगाळले होते. परंतु आता हे बस स्थानक हायवेवर असल्यामुळे बीओटीच्या माध्यमातून त्याचा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान तिलारीग्रस्तांचा प्रश्न सोडविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. तिलारी भागाचा विकास व्हावा या दृष्टीने सिंधूरत्न मधून आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्याची आपली मानसिकता आहे. विशेष म्हणजे मतदारसंघातील व्यक्तीने पर्यटनावर आधारित एखादा व्यवसाय सुरू केलास त्याला ३० टक्के सबसिडी उपलब्ध करून दिली जाणार आहे. जेवढे प्रस्ताव येतील तेवढ्या सर्वांना मान्यता देण्यात येणार आहे. जिल्ह्यात तब्बल दीडशे स्वमालकीची हॉटेल्स उभे राहणार आहेत. त्याचा फायदा स्थानिकांना होणार आहे.
यावेळी त्यांनी राजन तेली यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले फक्त प्रसिद्धी माध्यमातून राहायचे आणि कोणतेही काम करायचे नाहीत अशी काही जणांची पद्धत आहे. एखादी कंपनी जमीनीची पाहणी केल्याशिवाय ती आपल्याला जमीन पाहिजे असा प्रस्ताव देणार कशी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच आमदार नितेश राणे यांना मतदारसंघात जाऊन त्रास देणाऱ्यांना बदलण्यात यावे अशी मागणी आपण वरिष्ठांकडे करणार असल्याचे सांगितले. यावेळी संजू परब यांनी लँडमाफिया म्हणून टीका केली होती त्याला त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले त्यांनी टीका करण्यापेक्षा कोण आहेत त्यांचे फोटो जाहीर करावे. तसेच एखादी शेतकऱ्यांची जमीन दहा रुपयाला घेऊन ती १०० रुपयाला विकणे चुकीचे आहे.
शेतकऱ्याला योग्य तो मोबदला मिळणे गरजेचे आहे. कमिशन घ्या परंतु मोठा फरक घेऊन जमिनी विकून शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचे काम काही लोकांकडून सुरू आहे, मात्र त्यांच्या विरोधात मी नक्कीच संघर्ष सुरू करणार आहे असा इशारा त्यांनी यावेळी दिला. केसरकर पुढे म्हणाले सावंतवाडी येथील एका कंपनीकडून काही युवकांना ब्रेक देण्यात आल्याचे कळले आहे. परंतु त्याला सावंतवाडीत नोकरी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी एखादी कंपनी आणू तसेच आडाळी येथे अल्युमिनियमचे डबे बनवणारी कंपनी अडीचशे कोटी रुपयेचा प्रकल्प घेऊन येत आहे. त्यात अनेकांना रोजगार मिळणार आहे असे ते म्हणाले.