वॉर्सा – भारत-पोलंड संबंधांचे महत्त्व लक्षात घेत, नेत्यांनी हे संबंध ‘धोरणात्मक भागीदारी’मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला. व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संरक्षण आणि सुरक्षा, सांस्कृतिक सहकार्य आणि लोकांमधील संबंध यासह द्विपक्षीय भागीदारीच्या विविध पैलूंवर उभय नेत्यांनी व्यापक चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची आज वॉर्सा येथे भेट घेतली. पोलंडच्या ‘फेडरल चॅन्सेलरी’ येथे आगमन झाल्यावर पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. उभय नेत्यांमध्ये मर्यादित आणि शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली.
अन्न प्रक्रिया, शहरी पायाभूत सुविधा, पाणी, घनकचरा व्यवस्थापन, इलेक्ट्रिक वाहने, हरित हायड्रोजन, नवीकरणीय ऊर्जा, कृत्रिम बुध्दिमत्ता, खनिज आणि स्वच्छ तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये आर्थिक आणि व्यावसायिक सहकार्यासाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध आहेत, यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. उभय नेत्यांनी लोकांमधील थेट संबंध आणि सांस्कृतिक नाते अधिक दृढ करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या संदर्भात त्यांनी जामनगरचे महाराज आणि कोल्हापूरचे राजघराणे यांनी दाखवलेल्या औदार्याचा उल्लेख करून, त्या आधारे दोन्ही देशांमध्ये असलेल्या अनोख्या बंधावर प्रकाश टाकला.
युक्रेन आणि पश्चिम आशियातील संघर्षांसह परस्पर हिताच्या महत्त्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही नेत्यांनी चर्चा केली. त्यांनी संयुक्त राष्ट्रे आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमधील सुधारणा, हवामान बदलासंबंधी करावयाची कृती आणि दहशतवादामुळे निर्माण होणारे धोके; याविषयांवर विचार विनिमय केला. या बैठकीनंतर भारत-पोलंड धोरणात्मक भागीदारीच्या अंमलबजावणीसाठी एक कृती आराखडा आणि संयुक्त निवेदन जारी करण्यात आले.