ठाणे- आषाढी एकादशीजवळ आल्याने भाविकांना विठूरायाच्या दर्शनाची आस लागली आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या ठाणे विभागातून जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १३ जुलैपासून ठाणे जिल्ह्यातील सर्व आगारातून पंढरपूरसाठी या जादा बस सोडण्यात येणार असून १७ ते २२ जुलैदरम्यान पंढरपूरवरून त्या परतीच्या प्रवास करतील.
या जादा बसच्या प्रवासासाठी आरक्षणाची सोयही उपलब्ध करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली, वाडा, शहापूर, मुरबाड, बोरिवली (नॅन्सी कॉलनी) स्थानकातून १३ जुलैपासून या जादा बस सोडण्यात येणार आहेत. तर १७ ते २२ जुलै या कालावधीत पंढरपूरमध्ये चंद्रभागा बस स्थानकातून परतीच्या प्रवासाच्या बस सोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर भिवंडीवरून १६ व १७ जुलै रोजी सकाळी ६ वाजता इंदापूर-पुणेमार्गे बस सुटेल. १६ जुलै रोजी सकाळी ७ वाजता माळशेजमार्गे पंढरपूरसाठी बस सुटेल. तर याच दिवशी सकाळी ८.३० वाजता भिवंडी, कल्याण, फलटणमार्गे पंढरपूरला जाण्यासाठी बस सुटणार आहे.