फडणवीसांचा रेकॉर्डब्रेक प्रचार, 52 दिवसांत 115 सभा

0

मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचाराचा झंझावात केला. 26 मार्चपासून त्यांनी पहिल्या सभेला प्रारंभ केला आणि आज 18 मे रोजी राज्यातील पाचव्या टप्प्याचा प्रचार संपुष्टात आला, तेव्हा भिवंडीत त्यांनी 115 व्या सभेला संबोधित केले. महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या आपल्या प्रचारसभेतून फडणवीसांनीथेट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 10 वर्षातील विकासकामांची उजळणी, देशाची जगभरात उंचावलेली प्रतिमा, पाकिस्तानविरुद्ध घेतलेले निर्णय याची आठवणही फडणवीसांनी करुन दिली. वर्ध्यातून प्रचारसभांची सुरुवात करुन मुंबईतील शेवटच्या टप्प्यात भिवंडीत कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ शेवटची सभा घेऊन त्यांनी महाराष्ट्रातील प्रचार सभांची सांगता केली. मात्र, इथे थांबणे नाही म्हणत लवकरच उत्तर प्रदेशातील प्रचारसभेतही फडणवीसांची एंट्री होऊ शकते.

राज्यातील लोकसभा निवडणुकांसाठी प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर 26 मार्च रोजी देवेंद्र फडणवीसांची पहिली सभा ही चंद्रपुरातून प्रारंभ झाली. सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची ही सभा होती. 50 वी सभा ही नांदेड उत्तरमध्ये येथे 22 एप्रिल रोजी झाली. 1 ते 50 सभांचे अंतर पार करायला 26 दिवस लागले. 100 वी सभा शिवाजीनगर पुणे येथे 11 मे रोजी झाली. त्यामुळे 51 ते 100 या पुढच्या 50 सभा 15 दिवसांत झालेल्या आहेत. आज भिंवडीत समारोपाची झालेली सभा ही 115 वी सभा होती.

पहिली सभा ते आजची शेवटची सभा असे सलग एकूण 52 दिवस हा प्रचारसभांचा क्रम सुरू होता. या 52 दिवसांत 115 सभा करतानाच देवेंद्र फडणवीस यांनी विविध माध्यमांना एकूण 67 मुलाखती दिल्या आहेत. यात 35 मुलाखती या मुद्रीत माध्यमांना, 22 मुलाखती या इलेक्ट्रॉनिक माध्यमांना तर 8 मुलाखती या डिजिटल माध्यमांना होत्या. 2 मुलाखती या राष्ट्रीय साप्ताहिकांना होत्या.

मोदींनी 10 वर्षांत केलेला विकास, राष्ट्रहित, आर्थिक मुद्दे, देशाच्या सुरक्षाविषयक मुद्दे, राज्य सरकारच्या माध्यमातून झालेल्या स्थानिक विकासाचे मुद्दे, हिंदूत्त्व अशा विविध बाबी त्यांच्या भाषणातून मांडल्या गेल्या. या संपूर्ण 5 टप्प्यात स्थानिक गरजेनुसार, त्यांनी आपले निवासाचे मुख्यालय ठेवले. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात नागपूर हे मुख्यालय होते. तिसर्‍या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, जळगाव, पुणे अशा ठिकाणी मुक्काम केले. चौथ्या टप्प्यात प्रामुख्याने पुण्यात मुक्काम असायचा. पाचव्या टप्प्यात मुंबईत रात्रीचा मुक्काम केला. कार्यकर्त्यांच्या भेटी, पदाधिकार्‍यांच्या बैठका असा क्रम सभांनंतर सुरुच असायचा.

याशिवाय, संतवचन नावाने संतांचे अभंग, ओवींचा आधार घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम समाजमाध्यमांतून दररोज एका ग्राफिक्सच्या माध्यमातून मांडण्याचे काम सुद्धा त्यांनी केले. सुमारे 40 भागांची ही मालिका राहिली, जी 20 मेपर्यंत सुरु राहणार आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस व्यक्तीश: जागेवर जाऊन लोकांशी संवाद साधत होते, तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांनी महाराष्ट्रातील लक्षावधी, कोट्यवधी नागरिकांना संबोधित केले आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची सांगता झाली असली तरी, फडणवीसांना पुढील 2 टप्प्यात उत्तर प्रदेशच्या प्रचारासाठीची जबाबदारी दिली जाऊ शकते, असे दिसून येत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech