सातारा – सेल्फी घेण्याच्या नादात पुण्यातील २९ वर्षीय नसरीन कुरेशी बोरणे घाटात १०० फूट खोल दरीत कोसळली. मित्रांसोबत ठोसेघर धबधब्यावर फिरायला गेलेल्या नसरीनने, बंद असलेल्या धबधब्यापासून परतताना बोरणे घाटात गाडी थांबवून पावसाचा आनंद घेत सेल्फी काढण्यास सुरुवात केली. ओल्या कठड्यावरून पाय घसरल्याने ती दरीत पडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस, स्थानिक ट्रेकर्स आणि होमगार्डच्या टीमने तत्काळ बचावकार्य सुरू केले. होमगार्ड अविनाश मांडवे यांनी दरीत उतरून नसरीनला दोरीच्या साहाय्याने सेफ्टी बेल्ट लावून बाहेर काढले. नसरीन गंभीर जखमी झाली असून तिला साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.