भोसला कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी साधला चित्रपट निर्मितीवर संवाद
नाशिक : कुठल्याही चित्रपटासाठी लोकांच्या जिव्हाळ्याचे कौटुंबिक,आशयघन विषयाची निवड करून ते सुत्रबध्दपध्दतीने मांडण्यास रसिकांना अधिक भावतात, अशा चित्रपटांना केवळ प्रतिसादच मिळत नाही तर असा चित्रपट हिट,सुपरहिट होण्यासाठी रसिक त्याला उचलून धरतात, असे प्रतिपादन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी केले. भोसला मिलिटरी कॉलेजच्या जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन,मराठी,हिंदी विभागातर्फे घेण्यात आलेल्या संवादसत्रात ते चित्रपट निर्मिती एक प्रवास या विषयांवर बोलत होते. प्राचार्य डॉ.दिनेश नाईक हे व्यासपीठावर होते. कोल्हे म्हणाले, कुठलाही विषय हा चित्रपटाचा होऊ शकत नाही, चित्रपट निर्मिती करतांना संबंधीत विषयाची पार्श्वभूमी खूप महत्वाची असते. विषयाची निवड झाल्यानंतर मग त्यासाठीची पात्रे आणि अन्यबाबत निर्माता,दिग्दर्शकाला विचार करावा लागतो, एखादा विषय कुठल्या व्यक्ती,कलाकारांना अनुरूप ठरेल, तो विषय,भूमिका संबंधीत कलाकार किती ताकदीने मांडू शकेल, यावर त्या चित्रपटाचे यश अवलंबून असते, चित्रपटनिर्मिती हा खूप अवघड असा प्रवास आहे, निर्मात्याला एखादा विषय भावला तर तो निर्मितीच्या अनुषंगाने पैसा म्हणून खूप मोठी गुंतवणूक करत असतो, त्यामुळे आर्थिक बाबही महत्वाची आहे, यावेळी त्यांनी चित्रपटातील पात्र,अभिनेते, संवाद,संगीत,नेपथ्य यासारख्या विषयांवर संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारत शंकाचे निरसन केले. प्राचार्य डॉ.नाईक यांनी स्वागत केले. मराठी विभागप्रमुख डॉ.प्रमोद पवार यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी जर्नालिझम विभागप्रमुख प्रा. श्रीकृष्ण कुलकर्णी, प्रा. लोकेश माळी, हिंदी विभागप्रमुख प्रा.पुर्णिमा झेंडे उपस्थित होते.