पराभवाच्या भीतीने मोदींचे काँग्रेसवर खोटे आरोप…..!

0

काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांचा आरोप…..

मुंबई – अनंत नलावडे

काँग्रेस सत्तेत आल्यास अनुसूचित जाती व अनुसुचित जमातींचे आरक्षण संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत खोटा व जनतेची दिशाभूल करणारा असून आरक्षण व संविधान संपवण्याचे काम मोदी यांचा भाजपच करत आहे, अशा शब्दांत पलटवार करत केवळ पराभवाच्या भीतीने मोदी आता काँग्रेसवर खोटे आरोप करत असल्याचे सडेतोड प्रत्युत्तर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिले.

टिळक भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चेन्नीथला पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी दलित, आदिवासी, ओबीसी समाजाला सामाजिक न्याय मिळावा यासाठी जातनिहाय जनगणनेची मागणी केली.मात्र जातनिहाय जनगणनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे हे त्यांनी स्पष्ट करावे. कारण जातनिहाय जनगणनेला भाजपाचा विरोध असल्यानेच पंतप्रधान मोदी आरक्षण संपवण्याचा खोटा आरोप काँग्रेस पक्षावर करत आहेत. त्यामुळे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खोट्या आरोपाचा तीव्र निषेधही करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांना महाराष्ट्रातील जनतेचा प्रतिसाद मिळत नाही. मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या सभेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला.कारण जनताच आता मोदींच्या खोट्या बोलण्यास कंटाळली असून या सभेत मोदी रिकाम्या खुर्च्यांना संबोधित करत होते. याउलट लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रचार सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, असा दावाही चेन्नीथला यांनी केला.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उद्या १६ नोव्हेंबरला चिमूर व धामणगाव रेल्वे येथे जाहीर प्रचार सभा घेत असून असून सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या उद्या शिर्डी व कोल्हापुरात जाहीर सभा तसेच १७ तारखेला गडचिरोली व नागपूरमध्ये प्रचारसभा होतील,अशी माहितीही चेन्नीथला यांनी दिली. त्याचवेळी भाजपनेच शेतकऱ्यांची फसवणूक केली असून देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा व कापसाला योग्य भाव देण्याचे आश्वासन पाळले नाही.मात्र महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर सोयाबीनला ७००० रुपये प्रति क्विंटल भाव देऊ असेही चेन्नीथला यांनी यावेळी जाहिर केले.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत डाव्या विचारसरणीचे लोक होते या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना चेन्नीथला म्हणाले की, भारत जोडो यात्रा हे एक मोठे जनआंदोलन होते. यात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. या यात्रेतून त्यांनी देशातील गरीब, आदिवासी,दलित,वंचित,शेतकरी, महिला,तरुण वर्गांच्या समस्या व वेदना जाणून घेतल्या.मात्र जनतेचा या यात्रेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाल्याने भाजपला धास्ती बसल्यानेच त्यातूनच असे खोटे आरोप केले जात असल्याचा टोलाही चेन्नीथला यांनी भाजपला लगावला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech