अखेर अनिता बिर्जे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

0

ठाणे – गडकरी रंगायतन येथील उबाठा गटाचा मेळावा संपता संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जोर का झटका दिलाय. उबाठा गटाच्या उपनेत्या आणि गुरुवर्य स्वर्गीय आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या कट्टर शिवसैनिक सौ. अनिताताई बिर्जे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला.ठाण्यातील आनंदआश्रमात येऊन बिर्जे यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शिवसेनेच्या जडणघडणीच्या कालखंडात सौ. अनिताताई बिर्जे यांनी तत्कालीन शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहचवली होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमातही अनिता बिर्जे यांनी पक्षासाठी केलेले कार्य ठळकपणे दाखवण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांनी पक्षात उठाव करून पुन्हा सत्तास्थापना केली तेव्हा अनिता बिर्जे यांनी या निर्णयाला ठाम विरोध करून उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले होते.

उबाठा गटात कायम राहिल्यामुळे त्यांची उबाठा सेनेत उपनेतेपदी वर्णी लावण्यात आली होती. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने उबाठा गटाची ठाण्यात वाताहत झाली ती पाहता ठाण्यातील उबाठा गटाचे अनेक पदाधिकारी नाराज आहेत. एकनाथ शिंदे हेच स्वर्गीय दिघे साहेबांना अभिप्रेत असलेला जनसेवेचा वारसा पुढे चालवत आहेत हे पटल्यामुळेच त्यांनी आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बिर्जे यांनी यावेळी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करत असून ते पटल्यामुळेच आपण त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अनिता बिर्जे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला नवीन बळ मिळाले आहे. शिवसेनेची वाघीण पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होत असल्याचा आनंद आहे असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. बिरजेबाईंच्या आजवरच्या अनुभवाचा फायदा आगामी काळात पक्षाला नक्की होईल. ठाणे जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी अधिक मजबूत होऊन जोमाने काम करेल अशी अपेक्षा यावेळी शिंदे यांनी व्यक्त केली.

यावेळी ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ. मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक रमाकांत मढवी, टेम्भी नाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे आणि ठाणे शिवसेनेतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech