01 जून ते 31 जुलै या कालावधीत मासेमारी बंदी घोषित

0

रायगड : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत मासेमारी बंदी कालावधी 01 जून ते 31 जुलै (दोन्ही दिवस धरून 61 दिवस) करण्याकरिता मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तालयाच्या आदेशानुसार चालू वर्षी 01 जून ते 31 जुलै (दोन्ही दिवस धरून 61 दिवस) असा मासेमारी बंदी कालावधी घोषित केला आहे. या कालावधीमध्ये मासळीला प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. तसेच या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. त्याचप्रमाणे या कालावधीत खराब/वादळी हवामानामुळे होणारी जीवित व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. या आदेशामध्ये निर्देशित केल्याप्रमाणे, राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली असून पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू नाही.

राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास/केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा), 2021 च्या कलम 14 अन्वये नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल, तसेच कलम 17 मधील तरतुदीन्वये जास्तीत जास्त दंडात्मक शिक्षा करण्यात येईल. 01 जून पूर्वी मासेमारीस गेलेल्या नौकांना 01 जूननंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरात मासे उतरविण्यास परवानगी असणार नाही व अशा नौका महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा), 2021 अंतर्गत कारवाईस पात्र राहतील, त्यामुळे सर्व यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका 01 जून वा तत्पूर्वी बंदरात परतणे बंधनकारक आहे याची सर्व नौकामालकांनी नोंद घ्यावी. तसेच 31 जुलै वा त्यापूर्वी समुद्रात मासेमारीकरिता जाता येणार नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech