ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मुंबईत घेतला क्रिकेटचा आनंद

0

मुंबई : ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी रविवारी(२ फेब्रुवारी )मुंबईत पारसी जिमखान्याला भेट दिली आणि क्रिकेटचा मनसोक्त आनंद घेतला. मुंबईत क्रिकेट खेळल्यावर ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आपल्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट करत म्हंटले की, “क्रिकेटच्या या अप्रतिम अनुभवाचा मी पुरेपूर आनंद घेतला. मुंबईतील हा क्षण अविस्मरणीय ठरेल.” पुढे ते म्हणाले की, मुंबई दौऱ्यात टेनिस बॉल क्रिकेट खेळल्याशिवाय मजा येत नाही. त्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भाग घेत चौकार-षटकारांचा वर्षाव करत चाहत्यांना खुश केले. सुनक यांनी यावेळी आपल्या खेळाचा आनंद घेत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.

पारसी जिमखाना क्लबच्या वर्धापन दिन सोहळ्यादरम्यान ऋषी सुनक यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या आनंदाचे शब्दांत वर्णन करताना सांगितले, “या ऐतिहासिक क्लबमध्ये उपस्थित राहणे खूप विशेष आहे. येथे येण्याची संधी मिळाली हे भाग्य समजतो. क्रिकेट हा माझ्या हृदयाच्या जवळचा खेळ आहे, आणि आज जास्त वेळ आउट झालो नाही, याचा मला खूप आनंद आहे!” तसेच त्यांनी यावेळी पारसी जिमखान्याच्या भव्य इतिहासाबद्दल प्रशंसा व्यक्त केली आणि अशा आणखी दौऱ्यांची उत्सुकता दर्शवली.

पारसी जिमखान्याची स्थापना २५ फेब्रुवारी १८८५ रोजी झाली. सर जमशेदजी जीजीभॉय हे संस्थापक अध्यक्ष होते, तर प्रसिद्ध उद्योगपती जमशेदजी टाटा यांनी चेअरमन म्हणून भूमिका बजावली. हा क्लब १८८७ मध्ये मुंबईतील मरीन ड्राइव्हवरील सध्याच्या ठिकाणी स्थलांतरित झाला आणि तेव्हापासून क्रिकेटच्या इतिहासातील महत्त्वाचा भाग बनला आहे.गेल्या अनेक दशकांपासून पारसी जिमखाना येथे अनेक महान खेळाडूंनी आपली कारकीर्द घडवली असून पारसी समाजाच्या क्रीडा संस्कृतीचा तो अभिमानास्पद भाग आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech