पुणे – माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादाक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट पुण्यात कर्वेनगर भागात रचण्यात आला होता असे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित प्रवीण लोणकरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीणचा लोणकरचा भाऊ शुभम हा अद्यापही फरार आहे. पोलिस त्याच्या शोधात आहेत. शुभमच्या संपर्कात असलेल्या चौघांना मुंबई पोलिसांनी बुधवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे रुपेश मोहोळ, करण साळवे, शिवम मोहोळ आणि रियान खान अशी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या खून प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातून आणखी तिघांना बुधवारी रात्री ताब्यात घेतले आहे.
पुणे शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्याला दुजोरा मिळाला. रुपेश राजेंद्र मोहोळ (वय २२, रा. शिवणे), करण राहुल साळवे (वय १९, रा. उत्तम नगर) आणि शिवम अरविंद कोहाड (वय २०, रा. उत्तम नगर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची नुकतीच मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात वारजे परिसरातून प्रवीण लोणकर याला अटक केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातून आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे.