आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त शुभेच्छा
मुंबई : आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त वन मंत्री गणेश नाईक यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. अन्न सुरक्षा, पोषण आणि उपजिविकेमध्ये जंगलाचे महत्त्व अधोरेखित असून जंगले वाचली तरच मानवाला चांगले अन्न मिळू शकेल, त्यासाठी जंगलांचे संवर्धन व संरक्षण करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. २१ मार्च २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा होणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने २०१२ मध्ये २१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय वन दिन म्हणून घोषित केला. या दिनानिमित्त सर्व प्रकारच्या वनांचे महत्त्व पटवून दिले जाते. आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त, वृक्षलागवड, वन आणि झाडांशी संबंधित उपक्रम आयोजित करण्यासाठी स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्न करण्यास प्रोत्साहित केले जाते. अन्न सुरक्षा, पोषण, आणि जीविका यासाठी जंगलांचे महत्त्व आहे. जंगले केवळ अन्न आणि इंधन पुरवत नाहीत, तर ते जैवविविधता, जलस्रोत, आणि हवामान बदल यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त आपल्या पर्यावरणाची आणि जंगलांची काळजी घेण्याची प्रेरणा मिळो आणि आपण सर्वांनी मिळून जंगलाचे संरक्षण करूया, असे आवाहन नाईक यांनी केले आहे.