अखेर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत कोळी जमातीची बैठक संपन्न

0

सोलापूर- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी वारीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंढरपूर शहर दौऱ्यासाठी आले होते. त्यावेळी चंद्रभागा तिरी अन्यायग्रस्त महादेव कोळी जमातीच्या वतीने घेराव करण्यात आला व जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने आमच्याशी संपर्क साधुन चर्चेसाठी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात बैठक लावली. या बैठकीत आमच्या आदिवासी कोळी जमातीच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही पुकारलेले आंदोलन स्थगित केले असल्याची माहिती महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिली आहे.

कोळी जमातीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यानी अर्धा तास सखोल चर्चा केली. महादेव कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नाबाबतच्या येणाऱ्या अडचणी ,कोळी जमातीचे अभ्यासक प्रा. बाळासाहेब बळवंतराव यांनी सांगितल्या तसेच आदिवासी मंत्री, 25 आमदार व जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कशा पद्धतीने राज्यातील 31 जिल्ह्यातील महादेव, मल्हार ,टोकरे ,ढोर कोळी जमाती वरती अन्याय करत आहेत. याविषयी सविस्तर माहिती दिली, तसेच कोळी जमातीच्या प्रश्नासंदर्भात दोन वेळा रद्द केलेली मीटिंग पुन्हा घ्यावी. आदिवासी विभागाचे 25 आमदार व कोळी जमातीचे अभ्यासक व नेते यांना समोरासमोर बसवून आमचा प्रश्न सोडवावा अशी विनंती गणेश अंकुशराव व प्रा. बाळासाहेब बळवंतराव यांनी केली आहे.

यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारकाला मंजुरी मिळाली आहे परंतु अजुन निधी मिळाला नाही. इंग्रजांनी त्यांना चंद्रभागा नदीपात्रात पुंडलिक मंदिराजवळ अटक केली. त्याच ठिकाणी स्मारक व्हावे अशी मागणी केली यावरती बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,महादेव कोळी समाज हा अनुसूचित जमातीमध्येच आहे. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या काही अडचणी असतील तर त्या निश्चितपणे आम्ही आगामी विधानसभा निवडणुका पूर्वी सोडवू तसेच आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक नदीपात्रामध्ये बांधताना अडचणी निर्माण होतील त्यामुळे स्मारकासाठी दुसरी जागा सुचवा तातडीने तो प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech