मेहकर मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी, सिद्धार्थ खरात शिवसेना (ठाकरे) गटात

0

 

 

*मंत्रालयातील सहसचिव पदावरील स्वेच्छानिवृत्तीनंतर सिद्धार्थ खरात यांचा शिवसेना (ठाकरे) गटात प्रवेश

मुंबई – राज्यातील प्रशासकीय अधिकारी राजकारणात उतरण्याची अनेक उदाहरणे असताना मंत्रालयातील आणखी एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने आता राजकारणाची वाट धरली आहे.  मेहकर मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी, सिद्धार्थ खरात शिवसेना (ठाकरे) गटात प्रवेश केला. मंत्रालयात ३ दशकांहून अधिक काळ सेवा बजावत सहसचिव (गृह) या पदावर पोहोचलेले सिद्धार्थ खरात यांनी अलिकडेच स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली असून मंगळवारी त्यांनी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या पक्षात प्रवेश घेतला. आगामी विधानसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून ठाकरे गटातर्फे ते निवडणूक लढणार आहेत.

मातोश्री येथे मंगळवारी झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी खरात यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांना पक्षात प्रवेश दिला . या वेळी खा. अरविंद सावंत , माजी खासदार विनायक राऊत , बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना नेते प्रा. नरेंद्र खेडेकर , आशिष रहाटे व जिल्ह्यातील शेकडो शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते . सिद्धार्थ खरात यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभाग , ग्राम विकास विभाग , गृह विभागामध्ये सहसचिव म्हणून काम केले असून अनेक राज्यमंत्री , कॅबीनेट मंत्री व केंद्रीय राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव म्हणून सेवा बजावली आहे.

खरात हे बुलढाणा जिल्ह्यातील मातृतिर्थ असलेल्या सिंदखेड राजा तालुक्याचे रहिवाशी असून त्यांनी आपली नोकरीची जबाबदारी सांभाळून गेली २० वर्ष बुलढाणा जिल्ह्यात विविध विकास कामे व प्रकल्प नेऊन ते पूर्णत्वास नेण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी सिंदखेड राजा, देऊळगाव राजा , लोणार , मेहकर व चिखली तालुक्यात दुधाळ गायींचे वाटप करून दुध उत्पादनाची गोडी या परिसरांत लावून दुध संकलन केंद्रे उभारली आहेत.

तसेच त्यांनी मागील १५ – २० वर्षात जिल्ह्यात विविध सामाजिक , सांस्कृतिक , रोजगार विषयक उपक्रम राबविले आहेत . थोर महापुरूषांच्या जयंत्या, राष्ट्रमाता जिजाऊ जन्मदिनी मोफत खिचडी वाटप, बेरोजगार युवकांना मार्गदर्शन , शेतक-यांना पूरक उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टीने पर्यायी पूरक उत्पादनावर भर देऊन अनेक मेळावे आयोजित केले..

मेहेकर मतदार संघ हा मागील ३० वर्षापासून एकहाती प्रतापराव जाधव यांचेकडे राहीला असल्याने तेथे विकास कामे ठप्प झाली असून प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले सिद्धार्थ खरात यांच्या पक्ष प्रवेशाने मेहेकर – लोणार मतदार संघाच्या विकासाला चालना मिळेल, शेतकरी- शेतमजूर , बेरोजगार यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल आणि बुलडाणा जिल्ह्याची सामाजिक , राजकीय समीकरणे बदलतील, अशी भावना या पक्ष प्रवेश प्रसंगी व्यक्त करण्यात आली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech