मुंबई – विधान भवनातील समिती कक्षामध्ये महिला व मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बदलापूर घटनेने मुलींवरील अत्याचारांच्या घटना ह्या पुन्हा एकदा समाजासमोर आल्या आहेत. अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार हे निंदणीय आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. भविष्यात अशा घटना घडूच नये, लहान मुलांसाठी ‘गुड टच बॅड टच’ उपक्रम शैक्षणिक संस्थांमधून मोहिम राबवावी यासाठी शैक्षणिक संस्थामधून मुली, महिला सुरक्षिततेबाबत विशेष मोहिमद्वारे उपाय योजना राबवावी, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिल्या.
लहान मुलांना ‘गुड टच बॅड टच’ उपक्रम विस्तृत व प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देत उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, मुलांच्या जनजागृतीविषयी असलेले साहित्य एकत्रित करावे. या साहित्यावर शालेय शिक्षण विभागाने एक उत्कृष्ट सादरीकरण बनवून त्याचे संपूर्ण शाळांमधून मुलांपर्यंत पोहचवावे. राज्यात ८११२९ शाळांमध्ये सखी सावित्री कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उर्वरित शाळांमधून हा कक्ष तातडीने कार्यान्वीत करण्यात यावा. कक्ष स्थापन करण्यात आलेल्या शाळांपैकी किमान सुरूवातीला ८ हजार शाळांपर्यंत जनजागृतीपर उपक्रम पोहोचविण्यात यावा.
या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, परिवहन विभागाचे सह आयुक्त जितेंद्र पाटील, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन, नगर विकास विभागाच्या सहसचिव सुशीला पवार,महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शुभदा चव्हाण, गृह विभागाचे अवर सचिव अशोक नाईकवडे आदी उपस्थित होते.
मुले-मुलींच्या सुरक्षिततेबाबत शालेय शिक्षण विभाग,उच्च व तंत्र शिक्षण विभाग, परिवहन, ग्रामविकास व नगर विकास विभागाने वेळोवेळी शासन निर्णय निर्गमीत केले आहे. या शासन निर्णयांच्या अंमलबजावणीचे मुल्यमापन करावे. शासन निर्णय अंमलबजावणीतील अडचणीही लक्षात घ्याव्यात. मुलींच्या सुरक्षीततेच्यादृष्टीने शाळांमध्ये स्वच्छतागृहापर्यंत ने-आण करण्यासाठी महिला सहायक, विद्यार्थी बस वाहतूकीमध्ये महिला परिचर नियुक्तीबाबत पडताळणी करावी. शाळांमधून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दर दोन ते तीन दिवसांनी कॅमेऱ्यांच्या रेकॉर्डींग्जची पडताळणी करावी. संबंधित विभागांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत हेल्पलाईन क्रमांक जारी करावा. हेल्पलाईनवर तक्रारी करणे सोयीचे जाईल, असेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
शासकीय विभागाने परिपत्रक जारी केल्यावर त्याबाबत काय जागरुकता झाली,ते कितपत गांभीर्याने घेतले जात आहे याबाबत नियमित स्वरूपात मूल्यमापन केले जावे अशी यंत्रणा विकसित केली जावी. असे देखील यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. बस वाहतूक करणाऱ्या बसवर किंवा प्रवासी वाहनांवर सर्व नियम पाळणाऱ्या वाहनावर सुरक्षित वाहन असे स्टीकर लावावे. सदर स्टीकर दर्शनी भागात बसवर लावण्यात यावे. तसेच एसटी बसमधील मुलीं व महिलांच्या छेडछानी रोखण्यासाठी साध्या वेशात महिला पोलीस असावेत यामुळे बसमधील मुली सुरक्षित प्रवास करू शकतील. शाळांच्या स्नेहसंमेलनांमधून जनजागृती करावी तसेच बाल साहित्यावर प्रदर्शन भरवावेत तसेच विशेष कार्यक्रम करावेत अशा सूचनाही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी महिला, मुली यांचेवरील अत्याचार रोखण्यासाठी विभाग करत असलेल्या उपाय योजने बाबत सविस्तर माहिती दिली.