कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर करण्याचा सरकारचा विचार…..!

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विभागाला निर्देश

मुंबई: अनंत नलावडे

राज्यातील कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence – AI) वापर करण्याचा सरकार गांभीर्याने विचार करत असून यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय साधून या प्रकल्पाची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी संबंधित विभागाला दिले.

या संदर्भात आज मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.बैठकीस कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल (दूरदृष्य प्रणालीद्वारे),सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, अखिल भारतीय द्राक्ष बागायत संघाचे अध्यक्ष कैलास पाटील, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे (व्यय) प्रधान सचिव सौरभ विजय, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, साखर आयुक्त कुणाल खेमनार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग, सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील,बारामती कृषी विज्ञान केंद्राचे प्रा.निलेश नलावडे, प्रा. योगेश फाटके, प्रा.तुषार जाधव आणि प्रा. शरद ताटे उपस्थित होते.

जगभरातील प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत असून त्याचा कृषी क्षेत्रावरही सकारात्मक प्रभाव पडत आहे. महाराष्ट्रात बदलत्या हवामानामुळे पीक उत्पादनास अडथळे येत आहेत.अवेळी पडणारा पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव,मजुरांची कमतरता अशा समस्या सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्रात एआयचा वापर करणे अपरिहार्य आहे, असे मतही उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केले.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने कृषी क्षेत्रात खालील बाबींमध्ये सुधारणा करता येणार असून त्यात प्रामुख्याने पीक आरोग्याचे विश्लेषण मातीतील कार्बन आणि पोषणतत्वांचे निदान मातीच्या आरोग्याचा सखोल अभ्यास तण, कीड व रोगांचा त्वरित शोध आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना,मातीचे तापमान आणि वातावरणातील आर्द्रतेचे मोजमाप,पूर्वीच्या उत्पादनाची तुलना करून अधिक उत्पादनक्षम पद्धतींची अंमलबजावणी,पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम बनवणे आणि खर्च कमी करणे,आदींचा समावेश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्याचा प्रयत्न असून कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे शेती उत्पादन वाढणार असून, मजुरी खर्च कमी होईल.तसेच त्यामूळे रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरावरही नियंत्रण ठेवता येईल.आधुनिक तंत्रज्ञानामुळे कापणी प्रक्रिया अधिक जलद आणि अचूक होईल, परिणामी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन अधिक नफा मिळू शकेल, असा ठाम विश्वासही उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला.

या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने सहकार विभागाच्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर एआय प्रकल्प राबवून त्याच्या तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यतेचा अभ्यास करावा,असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असाही विश्वास त्यांनीं व्यक्त केला.

महाराष्ट्र सरकारकडून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यास प्रोत्साहनच दिले जात असून गेल्या काही वर्षांत हवामान बदलाचा शेतीवर मोठा परिणाम झाला आहे.त्यामुळे सरकारने सिंचन प्रकल्प, हवामान आधारित शेती, ड्रोन तंत्रज्ञान आणि स्मार्ट कृषी उपाययोजनांवर भर द्यायला सुरुवात केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आता कृषी क्षेत्रात एआयचा प्रभावी वापर केल्यास महाराष्ट्रातील शेतकरी अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानस्नेही होवून येत्या काही महिन्यांत या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास पूर्ण करून प्रायोगिक तत्वावर त्याची अंमलबजावणी सुरू करण्याच्या दिशेने सरकार काम करेल, असे संकेत या बैठकीत देण्यात आले.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech