मुंबई – फेक नरेटिव्हवर कार्यकर्त्यांनी ताबडतोब उत्तर दिले तर विरोधकांचे मनसुभे उधळले जातील. महायुती सरकारच्या दोन वर्षातील कल्याणकारी योजना घराघरात पोहोचवा. येत्या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शासकीय योजना व अंमलबजावणी संदर्भात महायुती पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा आज षण्मुखानंद सभागृह येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होतो. “एकजुटीने लढुया आणि एकजुटीने जिंकुया” असा यशाचा मंत्र मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
मुख्यमंत्री म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राने एक मोठा उठाव पाहिला. मतदारांच्या विश्वासघाताविरोधातील तो उठाव होता. आम्ही तो धाडसी निर्णय घेतला. त्यापूर्वी सर्व कामे ठप्प होती फक्त फेसबुक आणि वर्क फ्रॉम होम सुरु होते, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उबाठाला लगावला. महायुतीचे सरकारने सर्व निर्बंध हटवले, 24 तास काम करणारे सरकार आहे, असे ते म्हणाले. फेसबुक लाईव्ह नाही तर डायरेक्ट फेस टू फेस काम करणारे सरकार आहे, असे ते म्हणाले.
दोन वर्षात कॅबिनेटमध्ये घेतलेले निर्णय जनहिताचे घेतले. वैयक्तिक कोणतेही निर्णय़ घेतले नाहीत. या राज्यातील सर्वच घटक सुखी झाले पाहिजेत हाच सरकार उद्देश आहे. सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलेलो नाही, परंतु या राज्यातील नागरिकांच्या आयुष्याचं सोनं करण्याचे काम हे सरकार करत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. दोन वर्षांपासून सरकार पडेल असे बोलणाऱ्या विरोधकांचे चेहरे मात्र पडले. फेक नरेटिव्हवर लोक एकदाच फसतील पुन्हा फसणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महिला भगिनींची काळजी करणारे हे सरकार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महिलांसाठी योजना लागू करताना सरसकट सर्वांना लाभ देत आहोत. त्यात सरकार जात पात धर्म पाहत नाही. योजनेत अडथळा आणणाऱ्यांना कठोर शासन करणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. राज्याला मिळालेला कृषी पुरस्कार हा सगळ्यांना मिळालेला पुरस्कार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारने कल्याणकारी योजनांसाठी जवळपास 1 लाख कोटींची तरतूद केली आहे. दोन वर्षात सरकारने शेतकऱ्यांना 15 हजार कोटींची नुकसान भरपाई दिली.
‘एनडीआरएफ’चे नियम शिथील केले. एक रुपयात पीक विमा सुरु केला. शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये दिले जातात. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी वीज माफी आणि इतर योजना मिळून 50 हजार कोटी देण्यात आले आहे. मविआने नियमित कर्ज फेडणाऱ्य़ांना 50 हजारांचा प्रोत्साहनपर मदतीची घोषणा केली होती, मात्र त्याची पूर्तता महायुती सरकारने केली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काँग्रेसने 60 वर्ष शेतकऱ्याला दुर्लक्षित केले होते. योजनांअभावी शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या, अशी टीका त्यांनी केली.
राज्य सरकारने दोन वर्षात 130 सिंचन प्रकल्पांना सुप्रमा दिल्या. मविआने केवळ 4 सुप्रमा दिल्या होत्या. मुख्यमंत्री सहायता निधीमधून 250 कोटींची मदत गरजूंना दिली. अडीच कोटी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून 1500 रुपये दरमहा दिले जाणार आहेत. सरकारच्या योजनांचे श्रेय घेण्याचे काम विरोधक करत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ, मुलींना मोफत उच्च शिक्षण, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या योजना कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्हा, तालुका, गावातील घरोघरी पोहोचवल्या तर आगामी निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.