मुंबई : मुंबई जवळ होत असलेले वाढवण बंदर तसेच नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मोठ्या उंचीवर जाईल व त्यातून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले. ‘विकसित भारतासाठी लघु – माध्यम उद्योग क्षेत्राचा शाश्वत विकास’ या विषयावरील शिखर परिषदेचे उदघाटन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. ५) मुंबईत संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
परिषदेचे आयोजन महाराष्ट्र इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट असोसिएशन आणि SME चेंबर ऑफ इंडिया यांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यात लघु व माध्यम उद्योगांचे योगदान महत्वाचे राहील असे राज्यपालांनी सांगितले. मोठे उद्योग, लघु उद्योग तसेच सूक्ष्म उद्योग परस्परांना पूरक असतात त्यामुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग वाढले तर त्यांनी मोठ्या उद्योगांना देखील मदत होईल असे राज्यपालांनी सांगितले.
विकसित भारताचे लक्ष गाठण्यासाठी देशातील प्रत्येक व्यक्तीला आपले योगदान देणे आवश्यक आहे असे सांगून, भारताने पूर्वीच मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला असता जपान, कोरिया, जर्मनी आदी देशांप्रमाणे आपण देखील यापूर्वीच प्रगती करू शकलो असतो असे सांगून जपानच्या प्रगतीमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे योगदान फार मोठे असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
औद्योगिक विकासात लघु आणि मध्यम उद्योगांची भूमिका अतिशय महत्वाची असून या दृष्टीने SME चेंबर लघु उद्योगांना सक्षम करण्याचे उत्तम कार्य करीत असल्याचे राज्यपालांनी सांगितले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी राज्यातील विविध लघु आणि मध्यम उद्योगांना २३ वे “इंडिया SME उत्कृष्टता पुरस्कार” आणि १४ वे “प्राइड ऑफ महाराष्ट्र” पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रीय लघु व माध्यम उद्योग उत्पादकता अभियान, SME टीव्ही आणि SME लीगल सेलचे उदघाटन करण्यात आले.
महाराष्ट्र इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट असोसिएशनने आपल्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवसानिमित्त तसेच SME चेंबर ऑफ इंडियाच्या ३२ वा स्थापना दिनानिमीत्त या परिषदेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला SME चेंबरचे संस्थापक आणि अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, एएचआय मीडिया लॅबोरेटरीजचे अध्यक्ष डॉ. जी. एम. वारके, MIDAचे मुख्य सल्लागार मोहन राठोड, उपाध्यक्ष सुदेश वैद्य, एल अँड टी – सुफिन लिमिटेडचे भद्रेश पाठक यांसह उद्योजक व महिला उद्योजक उपस्थित होते.