राज्यपालांच्या हस्ते उद्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान समारंभ – दत्तात्रय भरणे

0

मुंबई : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षी यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी) व शिवछत्रपती राज्य पुरस्कार-खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षासाठीचे पुरस्कार राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे शुक्रवार, १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यावतीने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभास विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, विधानभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, आयुक्त हिरालाल सोनवणे उपस्थित राहणार आहेत.

पुणे, बालेवाडी येथे होणाऱ्या या समारंभात शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार २०२२-२३ साठी प्रदीप गंधे, तर २०२३ -२४ साठी शकुंतला खटावकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. २०१९-२० साठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विराज लांडगे (कबड्डी), गणेश नवले (जिम्नॅस्टीक), विराज परदेशी (मॉडर्न पेंटथलॉन), आदित्य गिराम (जलतरण –डायव्हिंग) यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर २०२०-२१ साठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जलतरणसाठी कोमल किरवे, वुशू क्रीडाप्रकारासाठी मिताली वाणी यांना प्रदान करण्यात येणार आहे. २०२१-२२ साठी जलतरणसाठी राजश्री गुगळे, जिम्नॅस्टीक्स साठी वैदही देऊळकर यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याचबरोबर उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग) या समारंभात खेळाडूंना प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech