मुंबई : शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून पदवी प्राप्त केल्यानंतर देखील जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण सुरूच ठेवले पाहिजे. स्वयंशिस्त, ध्येयासाठी परिश्रम व सातत्य ठेवल्यास यश हे निश्चितपणे मिळेल असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले. एचएसएनसी, मुंबई विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारोह राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या वरळी येथील दीक्षांत सभागृहात गुरुवारी (दि. ९) सपंन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध विद्याशाखांमधील ३८ गुणवत्ताप्राप्त स्नातकांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.कार्यक्रमाला एचएसएनसी विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ. निरंजन हिरानंदानी, विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. हेमलता बागला, एचएसएनसी मंडळाचे अध्यक्ष अनिल हरीश, कुलसचिव भगवान बालानी, परीक्षा मंडळाचे संचालक डॉ जयेश जोगळेकर, अधिष्ठाता, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, पालक तसेच स्नातक उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ निरंजन हिरानंदानी यांना विद्यापीठाचे पहिले प्रोव्होस्ट म्हणून यशस्वी कार्य केल्याबद्दल मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.