पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनीच आता राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांचे त्वरीत राजीनामे घ्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीने (आप) केली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे दोघेही गुन्हेगारी कृत्याशी संबधित गोष्टींमुळे अडचणीत आले आहेत, त्यातील कोकाटे यांनी तर न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे, तरीही ते राजीनामे द्यायला तयार नसल्याने आता राज्यपालांनीच यात भूमिका घ्यावे, असे आपने म्हटले आहे.
आपचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले की, यासंदर्भात कायदाच असे सांगतो की खासदार किंवा आमदार गुन्ह्यांसाठी दोषी आढळल्यास, त्यांना अपीलासाठी तीन महिन्यांचा कालावधी न देता त्यांचे सभागृहाचे सदस्यत्व त्वरीत रद्द करावे, त्यांना अपात्र ठरवावे. यातील मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप होत आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घातल्याचा त्यांच्यावर होत असलेला आरोप गंभीर आहे, त्याचबरोबर कृषीमंत्री असताना त्यांनी कोट्यवधीचे घोटाळे केल्याचे पुरावेही दिले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगत आहेत. असे असताना त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ त्यांना पाठीशी घालत आहेत, आरोप झाले म्हणून कोणी दोषी होत नाही असे समर्थन करत आहेत.