छत्रपती संभाजीनगर – सरकार मराठा समाजाची फसवणूक करणार नाही. कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देऊन दिलेला शब्द सरकार पाळणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सिद्धार्थ उद्यानात ध्वजारोहण समारंभ पार पडला. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, सग्या-सोयऱ्यांच्या अध्यादेशाबाबत काही आक्षेप आले होते. शासनाने न्या. शिंदे यांची कमिटी स्थापन केली आहे. त्यावर काम सुरू आहे. सध्या कुणबी प्रमाणपत्र आता मिळत आहे, हे सर्वांत मोठे यश आहे. कुठलाही समाजाच्या आरक्षणाला धक्का न देता दहा टक्के आरक्षण सरकारने दिले. त्याच्या विरोधात आज कोण न्यायालयात गेला ते पहा. आम्ही जे बोलतो ते करतो. ओठात एक पोटात एक अशी भूमिका नाही.
महायुतीमध्ये जागा वाटपावरून कुठलाही संघर्ष नाही. सर्वांना न्याय देण्याची भूमिका आहे. जागा वाटपाबाबत समन्वयाने बोलणी सुरू आहे. इतिहासात कधी नव्हते एवढे निर्णय आमच्या सरकारने घेतले आहेत. त्या जोरावर जनता आम्हांला पुन्हा निवडून देईल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. लाडकी बहीण योजना ही सर्वांत यशस्वी योजना आहे. त्यात खोडा घालण्याचे काम काही जण करत आहेत. महिलांना आमिष दाखवीत आहेत. न्यायालयात जाऊन विरोध केला जात आहे. या योजनेत खोडा घालणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी जोडा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा शिंदे यांनी यावेळी दिला.