मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘राम-सीता स्वयंवर’ आणि ‘सखी गीतरामायण’चा भव्य सोहळा संपन्न

0

पुणे : ग्रॅव्हिटी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. मिहीर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली राम नवमीच्या पूर्वसंध्येला “सखी गीतरामायण आणि राम-सीता स्वयंवर” या भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे अत्यंत भक्ती-भावात पार पडले. या आध्यात्मिक कार्यक्रमात हजारो रामभक्तांनी सहभाग घेतला आणि भक्तीमय अनुभवाचा लाभ घेतला. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आणि त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांच्यासोबत खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासणे, आमदार भीमराव तापकीर यांच्या सोबत अनेक मान्यवर व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांनीही सहभाग नोंदवला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भगवान श्रीराम हे केवळ धर्म आणि मर्यादेचे प्रतीक नसून, भारताच्या सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांचे मूळ आहेत. आज या अद्वितीय कार्यक्रमाला उपस्थित राहून मी स्वतःला भाग्यवान समजतो. गीतरामायणाची सादरीकरण आणि राम-सीता स्वयंवराचे नाट्य सादरीकरण इतके भव्य आणि सुंदर झाले की प्रत्येक प्रेक्षक भावविव्हल झाला. ही एक अशी सांस्कृतिक गोष्ट आहे जी आपल्या परंपरेला जिवंत ठेवते, आणि यासाठी मी ग्रॅव्हिटी ग्रुपचे डॉ. मिहीर कुलकर्णी यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.”

या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक डॉ. मिहीर कुलकर्णी (अध्यक्ष, ग्रॅव्हिटी ग्रुप, पुणे) यांनी सांगितले, “या ऐतिहासिक कार्यक्रमाचा भाग होणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आपली संस्कृती आणि परंपरा हीच आपली खरी ओळख आहे. गीतरामायण आणि राम-सीता स्वयंवर यांसारख्या सादरीकरणांमुळे आपण आपल्या मूळांशी जोडलेले राहतो. प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद आणि सकारात्मक अभिप्राय यामुळे सिद्ध होते की आजही प्रभू श्रीरामांविषयी आपल्यामध्ये अढळ श्रद्धा आणि प्रेम आहे. आम्ही भविष्यातही असे कार्यक्रम आयोजित करत राहू, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांनाही या गौरवशाली परंपरेची प्रेरणा मिळेल.”

कार्यक्रमात सुप्रसिद्ध संगीतकार स्व. श्री सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि ग. दि. माडगूळकर यांनी रचित “सखी गीतरामायण”ची अद्वितीय सादरीकरण झाले. या संगीतमय अनुभवाने संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि आनंदमय केले. त्यानंतर झालेल्या “राम-सीता स्वयंवर”च्या नाट्य सादरीकरणात भगवान श्रीरामांचे गुणगान आणि जनकपुरात झालेल्या स्वयंवराची भव्य झलक सादर करण्यात आली. देखणा मंच, संगीतमय सादरीकरण आणि भक्तिपूर्ण वातावरण यामुळे उपस्थित प्रत्येक प्रेक्षक श्रीरामभक्तीमध्ये रंगून गेला.

या कार्यक्रमात पुणे तसेच परिसरातील हजारो भक्तांनी सहभाग घेतला. भक्तांनी अत्यंत श्रद्धेने गीतरामायणाचा आस्वाद घेतला आणि राम-सीता स्वयंवराचे मंचन मंत्रमुग्ध होऊन पाहिले. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर उपस्थित सर्वांनी प्रभू श्रीराम व माता सीता यांना वंदन करत “जय श्रीराम!” चा गजर केला.हा भव्य कार्यक्रम पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासात एक सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला अध्याय ठरला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech