पायाच्या बोटांनी पेपर लिहून गौस शेखने मिळवले उत्तुंग यश

0

लातूर – अपंगत्वावर मात करुन अनेकांनी उत्तूंग यश मिळविल्याचे आपण आजपर्यंत पाहिले, ऐकले आणि वाचलेही आहे. परंतू, दोन्ही हात नसलेल्या गौस शेख या दिव्यांग विद्यार्थ्याने चक्क पायाच्या बोटांत पेन धरुन पेपर लिहून १२ वी विज्ञान शाखेत गगणभरारी घेतली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल दि. २१ मे रोजी जाहीर करण्यात आला. १२ वी परीक्षेच्या निकालात ‘लातूर पॅटर्नचा’ दबदबा कायम राहिला. लातूर जिल्ह्यातील वसंतनगर येथील रेणुकादेवी उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १२ वीचा विद्यार्थी गौस अमजद शेख यास खांद्यापासून दोन्ही हात नाहीत. परंतू, त्याने कधीही जिद्द सोडली नाही. विज्ञान शाखेत असलेल्या गौस शेख यांने अपंगत्वावर मात करुन फेब्रुवारी-मार्च २०२४ ची बोर्ड परीक्षा दिली. दिव्यांग विद्यार्थ्यांना रायटर घेण्याची सवलत आहे. परंतू, गौस शेख याने रायटर न घेता पायाच्या बोटात पेन धरुन उत्तर पत्रिका लिहिली आणि तो विज्ञान शाखेतून ७८ टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला आहे.

गौस शेख यास नियतीनेच दोन्ही हात दिले नाहीत. परंतू, गौस शेख कधीच खचला नाही. त्याने बारावी विज्ञान परीक्षेत उत्तूंग यश मिळवले. त्याने भविष्यात आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले आहे. इयत्ता १० वीतही त्याने ८९ टक्के गुण मिळवले होते. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech