ठाणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.5 ऑक्टोबर 2024 रोजी वालावलकर सभा मैदान, बोरीवडे गाव, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे (प.) येथे 33 हजार कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे ऑनलाईन भूमीपूजन व उद्घाटन तसेच “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या महिला लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील पहिली भूमिगत मेट्रो – कुलाबा-वांद्रे-सीप्झ : मुंबई मेट्रो मार्गिका – 3 टप्पा-1 (आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानक) शुभारंभ, ठाणे शहरांतर्गत वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमीपूजन, पूर्व मुक्त मार्ग विस्तार छेडा नगर, घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे प्रकल्पाचे भूमीपूजन, नैना नगर रचना परियोजनांतर्गत विविध पायाभूत सुविधा कामांचे भूमीपूजन, ठाणे महानगरपालिकेच्या नूतन इमारतीचे भूमीपूजन, “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक सत्कार, असे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी सुरक्षिततेच्या कारणास्तव नागरिकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी दुपारी 1 वाजेपर्यंत स्थानापन्न होणे आवश्यक आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.