चंदीगड : भारत-पाकिस्तान रेल्वे ट्रॅकवर एक हँड ग्रेनेड सापडला आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरील अटारी रेल्वे स्थानकानजीक हा हँड ग्रेनेड आढळून आला. पोलिसांनी हा हातगोळा जप्त करून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे २०१९ पासून भारज-पाकिस्तान दरम्यानची समझौता एक्स्प्रेस बंद झाली आहे. यासंदर्भातील माहितीनुसार हा ग्रेनेड रोडावली या सीमावर्ती गावाजवळ सापडला. या ठिकाणापासून पाकिस्तानची सीमा थोड्या अंतरावर आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की जप्त केलेला हँड ग्रेनेड बराच जुना आहे, परंतु त्याची नेमकी स्थिती आणि धोक्याची पातळी तपासली जात आहे.ग्रेनेड सापडल्यानंतर पोलिस आणि बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. हा बॉम्ब किती जुना आहे आणि तो येथे कसा पोहोचला हे पाहिले जात आहे.भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार थांबल्यानंतर हा रेल्वे मार्ग बराच काळ बंद आहे. अशा परिस्थितीत या भागात ग्रेनेडची उपस्थिती चिंतेचा विषय बनली आहे. हा ग्रेनेड येथे कसा आला आणि तो कोणत्या उद्देशाने टाकण्यात आला याचा तपास पोलिस आणि सुरक्षा संस्था करत आहेत. या घटनेनंतर, रेल्वे ट्रॅक आणि आजूबाजूच्या परिसराची कसून तपासणी केली जात आहे.