नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये आज,सोमवारी समान नागरी कायद्याची (यूसीसी) अंमलबजावणी करण्यात आल्याबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आनंद व्यक्त केला. आजचा दिवस अतिशय शुभ असल्याचे प्रतिपादन धनखड यांनी केले. राज्यसभा अंतर्वासिता कार्यक्रमातील सहभागींच्या पाचव्या तुकडीसाठी आयोजित उद्घाटनपर कार्यक्रमात उपराष्ट्रपती धनखड बोलत होते.याप्रसंगी उपराष्ट्रपती म्हणाले की, आज एक अत्यंत शुभ चिन्ह ठरणारी घटना घडली आहे. भारतीय संविधानाचा स्वीकार झाल्यानंतर आता देवभूमी उत्तराखंडने समान नागरी संहिता वास्तवात साकार केली आहे. देशातील एका राज्याने हे करून दाखवले आहे.
उत्तराखंड सरकारने त्यांच्या राज्यात समान नागरी संहिता लागू करून संविधान कर्त्यांची संकल्पना वास्तवात आणण्यासाठी दाखवलेल्या दूरदृष्टीबद्दल मी या सरकारचे अभिनंदन करतो आणि मला खात्री आहे की येत्या काही काळातच संपूर्ण देश अशा प्रकारच्या कायद्याचा स्वीकार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच यूसीसीला काही लोकांकडून होणाऱ्या विरोधाबाबत चिंता व्यक्त करत उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, “काही जण केवळ निष्काळजीपणामुळे यावर टीका करत आहेत. भारतीय संविधानाने निर्देशित केलेल्या एखाद्या गोष्टीवर आपण टीका कशी काय करू शकतो ? आपल्या संस्थापक जनकांकडून आलेला आदेश आहे तो. लिंग समानता प्रस्थापित करण्यासाठी केला जाणारा हा प्रयत्न आहे, त्याला आपण विरोध का करायचा राजकारणाची पाळेमुळे आपल्या मनांमध्ये इतकी खोलवर रुजलेली आहेत की आता त्यातून विष निर्माण झाले आहे.
राजकीय लाभासाठी लोक राष्ट्रवाद देखील सोडून द्यायला मागेपुढे पहात नाहीत, क्षणभर देखील त्याबद्दल चिंता न बाळगत नाहीत. समान नागरी संहितेच्या घोषणेला कोणीही विरोध कसे करू शकतो! तुम्ही त्याचा अभ्यास करा.संसदेत त्याबद्दल झालेल्या चर्चा अभ्यासा, अशी संहिता लागू करण्यासाठी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने किती वेळा सूचित केले आहे ते देखील पहा.”अवैध स्थलांतरीतांमुळे देशाच्या सुरक्षिततेला निर्माण होत असलेला धोका अधोरेखित करत उपराष्ट्रपती धनखड यांनी या संदर्भातील आव्हानांकडे लक्ष पुरवण्यावर अधिक भर देण्याची सूचना केली.