मुंबई – हरियाणा विधानसभा निवडणूकीत काँग्रेससाठी अनुकूल व भाजपासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना आज जे निकाल आले ते आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहेत. सकाळी बहुतांश मतदारसंघात काँग्रेस पक्ष आघाडीवर असताना अचानक उलटे चक्र कसे फिरले? मतमोजणी केंद्रावर अनेक तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. हरियाणाचा विजय हा भाजपाने प्रशासनाच्या मदतीने मिळवला असल्याने हा व्यवस्थेचा विजय आणि लोकशाहीचा पराभव आहे, अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काही जिल्ह्यातील ईव्हीएम मशिनची बॅटरी ९९ टक्के चार्ज होती आणि त्याच ठिकाणी काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला व भाजपाचे उमेदवार निवडून आले. ज्या ईव्हीएमच्या बॅटरी ६०-७० टक्के चार्ज होत्या त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. ईव्हीएमशी छेडछाड केल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे. भारतीय जनता पक्ष लोकांच्या मनातून उतरलेला आहे, हरियाणात तर भाजपाविरोधात प्रचंड संताप दिसला त्यामुळे गडबड करून मिळवलेला भाजपाचा हा विजय लोकशाही व्यवस्थेची हत्या करणारा आहे. यासंदर्भात काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाकडे तक्रार करेल पण हा निकाल काँग्रेसला मान्य नाही.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत असे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात निवडणुका निष्पक्षपणे पार पडाव्यात यासाठी वादग्रस्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी काँग्रेस पक्षाने देशाच्या मुख्य निवडणुक आयुक्तांकडे केली आहे.
हरियाणामध्ये भाजपाने गडबडी करुन विजय मिळवला असला तरी महाराष्ट्रातही तसे होणार नाही. दोन्ही राज्यातील परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रातील जनता भाजपा-शिंदेंच्या भ्रष्ट सरकारला कंटाळलेली आहे. भ्रष्टाचारात या सरकारने कळस गाठला आहे. जाती धर्माच्या नावावर भांडणे लावून निवडणूक जिंकण्याचा भाजपाचा कपटी डाव यशस्वी होणार नाही. असंवैधानिक पद्धतीने स्थापन करण्यात आलेल्या खोके सरकारला महाराष्ट्रातील जनता पायउतार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.
*जम्मू काश्मीरच्या जनतेने भाजपच्या विद्वेषी व विभाजवादी राजकारणाला हद्दपार केले.*
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्स आघाडीने बहुमत मिळवले आहे. जम्मू व काश्मीर या दोन्ही भागात इंडिया आघाडीने मोठा विजय मिळवला आहे. छोटे पक्ष व अपक्षांच्या मदतीने मतविभाजनाचा भाजपचा डाव हाणून पाडत जनतेने भाजपला हद्दपार केले आहे. जम्मू काश्मीरच्या जनतेचे मन:पूर्वक आभार मानतो आणि इंडिया आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.