नाशिक : शिवसेना त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख समाधान बोडके यांनी त्यांच्या मुलींच्या विवाहातील वायफळ खर्च टाळून नाशिक एज्युकेशन सोसायटी संचालित आश्रम शाळा, वेळूंजे आणि जिल्हा परिषद शाळा, वेळूंजे येथे गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात मदत उपलब्ध करून देत एक आदर्श उदाहरण ठेवले आहे. प्रत्येकी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश हा दोन्ही शाळांकडे सुपूर्द करण्यात आला असून येथील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात ही मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
लग्नांमध्ये मानपानाचे शाल, श्रीफळ, फेटे देण्याऐवजी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या विचारांनुसार या पद्धतीला फाटा देत वायफळ खर्च टाळून तीच मदत गोरगरीब व गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केली जाणार आहे. समाधान बोडके यांच्या या उपक्रमाचे मंत्री भुसे यांनीही कौतुक केले असून सर्वांनी असे बदल स्वीकारले पाहिजे. स्वतःपासून सुरुवात करावी आणि या उपक्रमाचा आदर्श इतरांनीही घ्यावा, असे आवाहनही केले.
शिवसेना त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख . समाधान बोडके यांची ज्येष्ठ कन्या चि. सौ. कां. किरण व चि. नितीन सौ. आणि द्वितीय कन्या चि. सौ. कां. शिवनेरी व चि. अविनाश यांचा विवाहसोहळा १६ फेब्रुवारी व १ मार्च रोजी पार पडत असून या पार्श्वभूमीवर हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमातून एक आदर्श ठेवण्यात आला असून याद्वारे प्रेरित होऊन इतरही ठिकाणी विवाह सोहळ्यांमधील शाल, श्रीफळ, बुके यांवरील वायफळ खर्च टाळून सदर रक्कम गोरगरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत म्हणून उपलब्ध करून दिली जात आहे.
समाधान बोडके यांनी यापूर्वीही गेल्या वीस ते पंचवीस वर्षांत शेकडो विद्यार्थांना शैक्षणिक मदत केली आहे. आई वडीलांचे छत्र हरपलेल्या चार वर्षाचा मुलगा आणि मुलगी यांना दत्तक घेऊन त्यांचा शाळेसह इतर खर्च करून त्यांचे लग्नही करून दिले. गोरगरीब मुलींचे कमी वयात लग्न करून न देता त्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाकरीता प्रोत्साहन देऊन अनेक मुला मुलींना त्यांनी शिक्षणासाठीही मदत केली आहे.