अंबरनाथच्या मिरॅकल केबल कंपनीबाहेर महाराष्ट्र परिश्रम संघाची उग्र निदर्शने
अंबरनाथ : अंबरनाथमधील मिरॅकल केबल कंपनीने बेकायदेशीरपणे काढून टाकलेल्या २५९ कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे अन्यथा कंपनी व्यवस्थापनाविरोधात अंबरनाथ बंद करू असा संतप्त इशारा महाराष्ट्र परिश्रम संघ या कामगार संघटनेतर्फे देण्यात आला आहे. कंपनी व्यवस्थापनाच्या या आडमुठ्या धोरणाविरोधात महाराष्ट्र परिश्रम संघाचे अध्यक्ष आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आज उग्र निदर्शने करण्यात आली. त्यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांनी हा इशारा दिला.
अंबरनाथच्या या मिरॅकल केबल कंपनी व्यवस्थापनाने गार्डनिंग, पॅकेजिंग आणि हाउस क्लिनिंगच्या नावाखाली अडीचशेहून अधिक कामगारांची भरती केली. आणि या कामगारांकडून कंपनीतील मुख्य स्वरूपाचे काम करून घेतले जात होते. तसेच किमान वेतन, आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी असे कामगार कायद्यातील कोणतेही फायदे या कर्मचाऱ्यांना दिले जात नव्हते. एकप्रकारे या कंपनी व्यवस्थापनाकडून या कामगारांची अन्यायकारक पिवळणूक केली जात होती. मात्र या कंपनी व्यवस्थापनाची ही चोरी पकडली गेल्यानंतर या 259 कामगारांना अन्यायकारक पद्धतीने तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आले. त्याविरोधात महाराष्ट्र परिश्रम संघाचे अध्यक्ष आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन महिन्यांपासून लढा सुरू आहे. महाराष्ट्र परिश्रम संघातर्फे या अन्यायकारी निर्णयाविरोधात वारंवार कंपनी व्यवस्थापनाकडे दाद मागण्यात येत आहे.
परंतू या कंपनी व्यवस्थापनाकडून कामगार कायद्याची खुलेआम पायमल्ली केली जात आहे. सर्व प्रकारचे शासकीय नियम आणि कायदे हे कंपनी व्यवस्थापन पायदळी तुडवत असल्यानेच अखेर आम्ही आता या लढ्याला उग्र रूप देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कामगार संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांनी दिली. आतापर्यंत आम्ही कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने आमचे आंदोलन सुरू ठेवले आहे. मात्र गेंड्याच्या कातडीच्या या कंपनी व्यवस्थापनाला झोपेतून जागे करण्यासाठी आम्हाला नाईलाजास्तव उग्र आंदोलन छेडावे लागेल असे सांगत या 259 कामगारांना कामावर न घेतल्यास अंबरनाथ बंदचा इशाराही नरेंद पवार यांनी यावेळी दिला. दरम्यान आज या कंपनीच्या गेटवर झालेल्या निषेध आंदोलनावेळी कंपनी प्रशासन हाय हाय, कामगार एकजुटीचा विजय असो, देश के हित में करेंगे काम – काम का लेंगे पुरा दाम अशा आशयाची जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र परिश्रम संघाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार, सचिव दिलीप कुमार मुंढे, उपाध्यक्ष सुरेंद्रसिंग यादव, सहसचिव सुरेश सकपाळ, खजिनदार धनाजी घरत, सदस्य दादाजी लिंडाईत, अरुण म्हात्रे, भीमराव बाविस्कर, मंगल सावंत तसेच भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजीत करंजुले पाटील, कल्याण जिल्हा सचिव दिलीप कणसे, अध्यक्ष अंबरनाथ पश्चिम मंडल (१) लक्ष्मण पंत, अध्यक्ष अंबरनाथ पश्चिम मंडल (२) प्रदेश तेलंगे, उपाध्यक्ष दीपक कोतेकर, आतिश पाटील, राजेंद्र कुलकर्णी, सुनिता लयाल, सुरेखा शहा, विजय सुर्वे, ओमकार काळे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार वर्ग उपस्थित होते.