नाशिक : ज्ञानवर्धिनी प्रसारक मंडळ व तळ्याची वाडी कृषी पर्यटन केंद्राच्या वतीने जगदंब क्रिएशन प्रस्तुत शिवपुत्र संभाजी महानाट्य ३० एप्रिल ते ५ मे दरम्यान तपोवनातील मैदानावर होणार असून त्यातून स्वराज्याचा धगधगता इतिहास लोकांसमोर येईल, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. गोपाळ पाटील यांच्या पुढाकाराने या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिका साकारणारे खा. डॉ. अमोल कोल्हे, डॉ. घनश्याम राव यांनी मुंबई ते जळगाव दौऱ्यादरम्यान नाशिक येथे भेट दिली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सभागृहात विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन शिवपुत्र संभाजी महानाट्य यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलतांना ते म्हणाले, शिवपुत्र संभाजी महानाट्य हे ऐतिहासिक विचारांचे प्रगल्भभांडार असून लहान थोरांपासून सर्वांनीच हे महानाट्य आवर्जून पहावे व महाराज यांच्या जिवनावर आधारीत असलेला धगधगता इतिहास तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन कोल्हे यांनी केले. प्रारंभी शिवपुत्र संभाजी महाराज यांचे नाशिकमध्ये सन २०२३ मध्ये पार पाडलेल्या महानाट्याच्या अनुभवाचे कथन समन्वयक योगेश कमोद यांनी केले. मागील वेळी सहा दिवस हे महानाट्य आयोजित केले असता नाशिककरांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे दोन दिवस डिमांड शो होऊन एकूण आठ दिवस हे महानाट्य यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या संस्थांनी परिश्रम घेतले त्यांचे आभार देखील कमोद यांनी मानले.