मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेने शिक्षण विभागात खूप प्रगती केली आहे. महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह किमान कौशल्य, संगणकीय शिक्षण, व्यावसायिक शिक्षणही दिले जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. मी देखील बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेचा विद्यार्थी असल्याने, मला या विभागाचा आपणही एक भाग असल्याचा अभिमान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालाड पश्चिम येथील चिंचोली शाळेला केंद्रीय मंत्री श्री. पीयूष गोयल यांनी आज (दिनांक २२ ऑगस्ट २०२४) भेट दिली. या भेटीनंतर मंत्री गोयल यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागात चारकोप नाका परिसरात ७ एकर क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या वैदिक थीम पार्कलाही भेट दिली. तसेच बोरिवली येथील आकुर्ली उड्डाणपुलाच्या कामाची देखील पाहणी केली.
यावेळी आ. सुनील राणे, आ. सुनील सागर, आ. अतुल भातखळकर, महानगरपालिकेचे सह आयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, उप आयुक्त (शिक्षण) चंदा जाधव, उप आयुक्त (परिमंडळ ७) भाग्यश्री कापसे, उप आयुक्त (विशेष) (अतिरिक्त कार्यभार) तथा सहायक आयुक्त (पी उत्तर) किरण दिघावकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी आदी उपस्थित होते.
चिंचोली शाळेला भेटी दरम्यान शाळेतील श्रीगणेश मूर्ती प्रदर्शन, राखी प्रदर्शन, संगणक कक्ष, वाचनालय, बालवाडीवर्ग, माध्यमिक व प्राथमिक वर्गांना भेटी देऊन मंत्री गोयल यांनी विद्यार्थ्यांशी हितगूज केले. उत्तर मुंबईतील शाळा, रुग्णालये अधिक आधुनिक करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यानंतर पी उत्तर विभागात चारकोप नाका परिसरातील वैदिक थीम पार्क येथे मंत्री गोयल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सहायक आयुक्त (पी उत्तर) किरण दिघावकर यांनी पार्कच्या संकल्प चित्रावरुन मंत्री गोयल यांना प्रकल्पाबाबत माहिती दिली. मुंबईकरांसाठी हा प्रकल्प उत्तम असून लवकरात लवकर पूर्ण करा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. त्यानंतर मंत्री गोयल यांनी मालाड येथील अथर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.