बांधकामासाठी सरकारने १३.४६ कोटी रुपये केले मंजूर
मुंबई : २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मुंबई पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हे स्मारक सातारा जिल्ह्यातील केडांबे या त्यांच्या मूळ गावी बांधले जाणार आहे. या स्मारकाच्या बांधकामासाठी राज्य सरकारने १३.४६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या मंजुरीनंतर, मंजूर झालेल्या २.७० कोटी रुपयांच्या रकमेचा पहिला हप्ता शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला देण्यात आला. २६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना आपले प्राण अर्पण करणा-या तुकाराम ओंबळे यांच्या शौर्य आणि बलिदानाच्या सन्मानार्थ हे स्मारक बांधले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने उपरोक्त विषयावर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.
२००८ मध्ये झालेल्या या हल्ल्यावेळी अजमल कसाब आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कामा रुग्णाल, लियोपोल्ड कॅफे, ताज हॉटेल आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवला होता. दरम्यान, कामा रुग्णालयात हल्ला केल्यानंतर पुढे जात असलेल्या अजमल कसाब आणि त्याच्या एका सहकाऱ्यावा मुंबई पोलिसांनी वाटेत रोखले होते. त्याचवेळी कसाब याला जिवंत पकडत असताना तुकाराम ओंबळे यांना वीरमरण आले होते. त्यांनी दाखवलेल्या शौर्याचा गौरव म्हणून त्यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.