नागपूर – नागपूर येथील दीक्षाभूमीवर 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता. भारताच्या कानाकोपऱ्यापासून ते नेपाळ, थायलॅण्ड, जापान, श्रीलंका येथून मोठ्या संख्येने अनुयायी दीक्षाभूमीवर आले होते. दीक्षाभूमी येथील स्तुपामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिंचे जतन केलेला कलश दर्शनार्थ ठेवण्यात आला आहे. या पवित्र अस्थिंचे दर्शन घेण्यासाठी अनुयायांची रांग लागली होती. दीक्षाभूमी परिसरातील बोधी वृक्षाला आकर्षक रोषणाईने सजविले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील दीक्षाभूमीचा परिसर प्रकाशाने न्हावून निघाला होता. समता सैनिक दलाचे सैनिक आपली सेवा व सुरक्षा पुरविताना दिसून आले. लाखोंच्या संख्येने येणाºया अनुयायांसाठी हजारावर संघटना सरसावल्या होत्या. पाण्यापासून ते भोजनदानाची चोख व्यवस्था त्यांनी केली होती.नागपुरात 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने समता सैनिक दलाने संविधान चौक ते दीक्षाभूमीपर्यंत उत्कृष्ट पथसंचालन करून अनेकांचे लक्ष वेधले. पथसंचालनात प्रथम भिक्खू संघ, नंतर पंचशिलेचा ध्वज हाती घेतलेला युवक आणि त्याच्या मागे निळ्या गणवेशातील शेकडो भीम सैनिक चालत होते. समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक सुनील सारिपुत्त, प्रकाश दर्शनिक, अशोक बोंदाडे, दीपक वाघमारे, पुरुषोत्तम संबोधी, किशोर चहांदे यांच्या मार्गदर्शनात आरबीआय चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून धम्मक्रांती अभिवादन मार्च दीक्षाभूमीकडे निघाला. मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंट चौक, व्हेरायटी चौक, सीताबर्डी, जनता चौक, सेंट्रल बाजार मार्गाने हा मार्च दीक्षाभूमी येथे पोहचला.
या दरम्यान समता सैनिक दलाच्या शेकडो जवानांनी शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचालन केले. काठी, दांडपट्ट्याच्या कसरती करून लक्षही वेधले. दीक्षाभूमीवर पोहचताच जयबुद्ध-जयभीमच्या जय घोष करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मानवंदना देण्यात आली. या मार्चमध्ये जापान, श्रीलंका येथील भन्तेही सहभागी झाले होते. मार्चमध्ये देशाच्या कानाकोपºयातून सहभागी झालेल्या सैनिकामध्ये तरुण-तरुणींची संख्या मोठी होती. समता सैनिक दलाच्यावीने 6 ते 13 ऑक्टोबर दरम्यान कामठी रोड बुद्धभूमी येथे राष्ट्रीय धम्मक्रांती महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दीक्षाभूमीवरून हे सर्व सैनिक या महाशिबिरात सहभागी होतील.