पुणे : तेजस्विनी महिला विशेष बससेवा ८ मार्च २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सुरू करण्यात आल्या. त्यावेळी ‘पीएमपी’ने प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला या बसमधून महिला मोफत प्रवास करू शकतील असे जाहीर केले होते. महिन्याच्या इतर दिवशीही बसचा ताफा शहरातील रस्त्यांवर सशुल्क तिकिटांसह गर्दीच्या वेळेत कार्यरत राहील, असे सांगण्यात आले होते. ज्यावेळी सेवेचे उद्घाटन करण्यात आले, तेव्हा तेजस्विनी महिला बससेवा शहरातील सर्वांत व्यस्त १९ मार्गांवर सुरू करण्यात आल्या होत्या. सध्याच्या आकडेवारीनुसार केवळ १३ मार्गांवर या बस सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
‘पीएमपी’कडून महिला प्रवाशांसाठी २०१८ मध्ये ‘तेजस्विनी महिला बससेवा’ सुरू करण्यात आली. मात्र, अलीकडच्या काळात या बसेसमध्ये कमालीची घट झाली आहे. परिणामी महिला प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. ‘पीएमपी’ने महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी ही बससेवा सुरू केली होती. मात्र, ही सेवा गेल्या काही दिवसांपासून दिसेनाशी झाली आहे.